क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित केआर शेट्टी चषक लिजंड क्रिकेट स्पर्धेत बेळगाव कोचर्स संघाने बेळगाव टीम ओनर्स संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून केआर शेट्टी चषक पटकाविला. मिलिंद चव्हाणना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर टीम ओनर्स संघाने 13.3 षटकात सर्व बाद 98 धावा केल्या. एन. बी. पाटीलने 30, चंदन कुंदरनाडने 20, पुनित शेट्टीने 21, विजय कुरीने 15, प्रवीण कुराडेने 10 धावा केल्या. कोचर्स संघातर्फे मिलिंद चव्हाणने 8 धावात 3, प्रमोद पालेकरने 6 धावात 3, देवेंद्र कुडचीने 8 धावात 2, नंदकुमार मलतवाडकर व आरिफ बाळेकुंद्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बेळगाव कोचर्स संघाने 10.3 षटकात 2 बाद 99 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. मिलिंद चव्हाणने 3 षटकार 9 चौकारासह 26 चेंडूत 63 धावा फटकावल्या. गौसपीर हाजीने नाबाद 11 धावा केल्या. टीम ओनर्सतर्फे रवी पिल्ले व एन. बी. पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रशांत मनकाळे, नरेंद्र भोसले, गोकाककर, विवेक पाटील यांच्या हस्ते विजेत्या बेळगाव कोचर्स व उपविजेत्या बेळगाव टीम ओनर्स संघाला चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.