वृत्तसंस्था/ दुबई
डब्ल्यूटीए टुरवरील येथे शनिवारी झालेल्या दुबई चॅम्पियनशिप महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बार्बोरा क्रेसिकोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का दिला. 2023 च्या टेनिस हंगामातील क्रेसिकोव्हाचे हे पहिले तर वैयक्तिक कारकिर्दीतील सहावे विजेतेपद आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रेसिकोव्हाने स्वायटेकचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच क्रेसिकोव्हाने डब्ल्यूटीए मानांकनातील पहिल्या तीन खेळाडूंचा पराभव करत विजेतेपद हस्तगत केले. अशी कामगिरी करणारी क्रेसिकोव्हा ही पाचवी महिला टेनिसपटू आहे. अलीकडेच स्वायटेकने डोहा टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते. या स्पर्धेत क्रेसिकोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेती तसेच द्वितीय मानांकित सबालेंकाचा तर त्यानंतर उपांत्य फेरीत अमेरिकेच्या तृतीय मानांकित जेसिका पेगुलाचा पराभव केला होता. आता या जेतेपदामुळे महिला एकेरीच्या मानांकनात क्रेसिकोव्हा तिसाव्या स्थानावरुन सोळाव्या स्थानी झेप घेईल.