ऑनलाईन टीम/तरुण भारत
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेतील आणखी एक नेता आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अडचणीत सापडला आहे. सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने (ACB) चौकशी केली आहे. एसीबीने तब्बल अर्धा तास चौकशी केली, यानंतर २० वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांचा वेळ दिली आहे.
वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान शुक्रवारी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडून चौकशी झाली. यावेळी एसीबीने वैभव नाईक यांना २००२ ते २०२२ या कालावधीतील उत्पन्नाची चौकशी केली. तसेच नाईक यांना उत्पन्नाचा तपशील देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. या आठ दिवसांत सर्व माहिती देण्याचे आदेश एसीबीनं वैभव नाईक यांना दिले आहेत.
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाई यांच्या मालमत्तेविषयी चौकशी केली. कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात ही चौकशी झाली. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर एसीबीने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटातील अनिल परब यांच्यानंतर कोकणातील आणखी एक नेता तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला आहे.
हे ही वाचा : Kamal Hasan : चोल काळात हिंदू धर्म नव्हता : कमल हसन यांचा वेत्रीमारन यांना पाठिंबा