डीएमएना सादर, राजीनाम्याविषयी पाळलेल्या गुप्ततेवरून सवाल, आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे पालिकेतील नगराध्यक्षपदावरून चाललेल्या वादाची परिणती नगराध्यक्ष विश्वास सावंत यांनी 9 रोजी पणजी येथील डीएमए कार्यालयात आपल्या पदाचा राजीनामा देण्यात झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सदर राजीनामा मागे घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाते. ती मुदत आज गुरुवार 16 रोजी संपणार आहे. सदर राजीनामा देण्याची घडामोड गुप्त ठेवण्याबद्दल काही संघटनांनी प्रश्न उपस्थित केले असून या प्रकाराबद्दल कुडचडे परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कुडचडे-काकोडा पालिका मंडळात गेल्या कित्येक दिवसांपासून नगराध्यक्षपदावरून वाद चालला आहे. सुरुवातीच्या तोंडी समझोत्याप्रमाणे नगराध्यक्ष सावंत यांचा ठरलेला कार्यकाळ संपला, तरी ते खुर्ची सोडत नसल्यामुळे त्याचा गाजावाजा झाला होता. तसेच सदर पदावर नगरसेविका जस्मिन ब्रागांझा यांना बसविण्यात येणार असल्याची आणि त्यास 11 नगरसेवकांनी विरोध दर्शविल्याची वार्ता पसरली होती.
सध्या कुडचडे पालिकेत चाललेल्या घडामोडी कोणाच्या सांगण्यावरून गुप्त ठेवण्यात येत आहेत असा प्रश्न लोकांनी विचारायला सुरुवात केली असून यासंदर्भात स्थानिक आमदाराविषयी शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत. सावंत हे कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष असून तोंडी समझोत्याच्या आधारावर ठरलेला त्यांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला, तरी त्यांनी राजीनामा न देण्यामागे ही बाब असू शकते असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. राजीनाम्याचे पाऊल न उचलण्यास त्यांना सांगितले गेले होते की काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कुडचडे-काकोडा पालिकेत एकूण पंधरा प्रभाग आहेत. सुरुवातीला काही नगरसेवकांनी एकत्र येऊन व विरोध दर्शविणाऱया नगरसेवकांना बाजूला सारून नगराध्यक्षपदावर विश्वास सावंत यांना बसविले होते. आता सावंत यांनी राजीनामा दिल्याने ही एकी राहिलेली नसून नगराध्यक्षपदासाठी चुरस लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर पद कोणाच्या हातात येणार याची उत्सुकता वाढत चालली आहे. अवघ्या आठ दिवस अगोदर जस्मिन ब्रागांझा यांना असलेला विरोध प्रसारमाध्यमांतून उमटला होता. तो विरोध कायम राहणार की मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचप्रमाणे सदर पद शेवटी ब्रागांझा यांना न देता अन्य कुणा इच्छुकाच्या हाती तर दिले जाणार नाही ना हाही चर्चेचा विषय बनला आहे.