वाकरे / प्रतिनिधी
कुंभी नदीत पाय धुण्यासाठी गेल्यानंतर नदीत पाय घसरून पडल्याने कुडीत्रेपैकी पडवळवाडी (ता. करवीर) येथील युवकाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला. विजय दामोदर पडवळ (वय ३२)असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ व करवीर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मृत विजय रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास पडवळवाडी शेजारी असणाऱ्या कुडीत्रे-सांगरुळ रस्त्यावरील धरणाशेजारी कुंभी नदीत पाय धुण्यासाठी गेला होता.यावेळी पाय घसरून नदीत पडल्याने तो बेपत्ता झाला होता.नदीकाठी त्याची मोटरसायकल व कपडे सापडल्याने तो नदीत पडला असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.म्हणून रविवारी रात्री उशिरापर्यंत नदीत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अंधार पडल्याने रात्री हे प्रयत्न थांबवण्यात आले.सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह कुंभी नदीत सापडला.शवविच्छेदन करून त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगी असा परिवार आहे. फिर्याद शरद पडवळ यांनी दिली.याची करवीर पोलिसात नोंद झाली असून हवालदार किरण माने पुढील तपास करत आहेत.