वेगळ्या राज्याची मागणी कायम : मुख्यमंत्री विरेन सिंह यांचा विरोध
वृत्तसंस्था /इंफाळ
मणिपूरमधील एन. विरेन सिंह सरकारसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा न करण्याचा निर्णय कुकी समुदायाचे 8 आमदार आणि इतर नागरी संघटनांनी घेतला आहे. कुकी समुदायाशी संबंधित आमदार वेगळ्या राज्याची मागणी करत आहेत. राज्यातील हिंसेनंतर कुकी समुदायाने वेगळे राज्य स्थापन करण्याची मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी फेटाळत राज्याच्या एकतेशी कुठलीच तडजोड करणार नसल्याचे म्हटले होते. मिझोरमच राजधानी आयझोलमध्ये चिन-कुकी-जोमी-हमार समुदायांच्या नागरी संघटना आणि आमदारांची बैठक झाली आहे. या बैठकीत भाजपचे आमदार देखील सामील झाले होते. वर्तमान संकटाला एकजूट होत सामोरे जाण्याचा तसेच मणिपूर सरकारसोबत कुठलीच चर्चा न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आाल आहे. अन्य संघटनांसोबत एका राजकीय अजेंड्यावर सहमती निर्माण करण्यासाठी विचारविनिमय करत आहोत असेही सांगण्यात आले. कुकी समुदायासाठी वेगळे केंद्रशासित प्रदेश किंवा कुकी समुदायासाठी राजकीय संरक्षणासाठी पूल उचलण्याशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली असल्याचे बैठकीत सहभागी झालेल्या एका प्रतिनिधीने सांगितले आहे. यापूर्वी 12 मे रोजी कुकी समुदायाशी संबंधित आमदारांची बैठक झाली होती, ज्यात भाजपचे 7 आमदार देखील सामील झाले होते, या बैठकीत चिन-कुकी-मिझो-जोमी-हमार समुदायाच्या प्रतिनिधींनी वेगळ्या राज्याची मागणी केली होती. मणिपूरमध्ये मैतेई समुदायाकडून आदिवासी दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. याच्या विरोधात 3 मे रोजी ट्रायबल सॉलिडॅरिटी मार्च काढण्यात आला होता. यानंतर राज्यात हिंसा भडकली होती. या हिंसेत सुमारे 70 जणांना जीव गमवावा लागला आहे. हिंसा रोखण्यासाठी मणिपूरमध्ये सैन्य तैनात करावे लागले आहे. तसेच मणिपूरमधून पलायन करत सुमारे 6 हजार लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला आहे.