काँग्रेसमधून आमदाराची हकालपट्टी ः भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणा काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले आमदार कुलदीप बिश्नोई यांनी रविवारी सकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतली आहे. या भेटीची छायाचित्रे बिश्नोई यांनीच ट्विटरवर प्रसारित केली आहेत. या भेटीनंतर बिश्नोई हे लवकरच भाजपमध्ये सामील होणार असल्याचे मानले जात आहे.
अलिकडेच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान कुलदीप यांच्या क्रॉस व्होटिंगमुळेच काँग्रेस उमेदवार अजय माकन यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर काँग्रेसने कुलदीप यांना सर्व पदांवरून हटविले होते. शाह यांची भेट घेण्यापूर्वी बिश्नोई यांनी स्वतःच्या ट्विटर बायोवरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची छायाचित्रे हटविली आहेत. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतचे भजनलाल यांचे छायाचित्रही त्यांनी हटविले आहे.
हरियाणामध्ये 2024 साली विधानसभा निवडणूक होणार असली तरीही भाजपने आतापासूनच तयारी चालविली आहे. माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई हे सध्या आदमपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. कुलदीप हे काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. अशा स्थितीत कुलदीप यांना पक्षात सामील करवून घेतल्यावर भाजप काँग्रेसला मोठा झटका देण्यास यशस्वी ठरणार आहे.
अमित शाह यांना भेटणे खरोखरच सन्मान आणि आनंदाची गोष्ट आहे. एक खरा राजकारणी असलेल्या शाह यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांचा करिष्मा अनुभवल आहे. भारतासाठीचा त्यांचा दृष्टीकोन विस्मयकारी असल्याचे बिश्नोई यांनी ट्विट करत म्हटले आहे. याचप्रकारे नड्डा यांना भेटून आनंद झाला. त्यांचा सरळ आणि विनम्र स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळा करणारा आहे. त्यांच्या सक्षम अध्यक्षतेखाली भाजपने अभूतपूर्व उंची गाठली असल्याचे उद्गार बिश्नोई यांनी काढले आहेत.
हरियाणातील राजकारणात बिश्नोई यांना बिगरजाट चेहरा म्हणून ओळखले जाते. बिश्नोई हे यापूर्वी हिसारचे खासदार देखील राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी हरियाणा जनहित काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला होता.