

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कुमारी शैलजा आणि प्रख्यात वकील अभिषेक मनू सिंघवी यांना पक्षाने कार्यकारिणी समितीत स्थान दिले आहे. हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर शैलजा यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीत सामील करण्यात आले आहे. तर नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भविष्यात होणाऱया कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर सिंघवी यांना हे पद काँग्रेसकडून मिळाले आहे. याचबरोबर आंध्रप्रदेशचे माजी खासदार टी. सुब्बारामी रेड्डी यांनाही कार्यकारिणी समितीचे सदस्य करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातील नेते अजय कुमार लल्लू यांना विशेष आमंत्रित सदस्य करण्यात आले.
कपिल सिब्बल हे पक्षातून बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर सिंघवी यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीत एंट्री मिळाली आहे. काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने सिंघवी यांची कार्यकारिणी समितीतील नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तर शैलजा यांना कार्यकारिणी समितीत सामील करण्याचा निर्णय म्हणजे हरियाणातील सत्ता समीकरणे संतुलित करण्याचा प्रयत्न आहे. भूपिंदर हुड्डा तसेच शैलजा यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याचा विचार पक्षश्रेष्ठींचा असू शकतो. भूपिंदर हुड्डा यांचे पुत्र दीपेंद्र हे राज्यसभा खासदार आहेत.