Tarun Bharat

कुमार विश्वास यांच्यावर एफआयआर

पंजाब पोलिसांची कारवाई ः 26 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात पाचारण

चंदिगढ / वृत्तसंस्था

एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले कुमार विश्वास यांच्याविरोधात आम आदमी पक्षाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी रोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोटीस बजावण्यासाठी पोलिसांचे एक पथक विश्वास यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना 26 एप्रिल रोजी रोपर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. रोपर एसपी (डी) हरबीर अटवाल यांनी याला दुजोरा दिला आहे. याच प्रकरणात अलका लांबा यांनाही नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. लांबा यांच्यावर वेगवेगळय़ा वाहिन्यांना मुलाखती देऊन केजरीवाल यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले आहे.

पंजाब पोलीस बुधवारी सकाळी प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचले. गाझियाबादमधील त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्याचे फोटो विश्वास यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यादरम्यान पोलिसांनी त्यांना आपण केजरीवाल यांच्यावर खलिस्तानचे समर्थक असल्याचा आरोप केला होता काय? अशी विचारणा केली. तसेच यासंदर्भातील पुरावे पंजाब पोलिसांना द्या आणि तपासात सहकार्य करा, असेही तपास पथकाने त्यांना बजावले.

पंजाब पोलीस पहाटे प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचले तेव्हा पोलीस कोणत्या प्रकरणाचा तपास करत आहेत, यासंबंधी विविध तर्कवितर्क करण्यात आले. तथापि, कुमार विश्वास यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर वादग्रस्त विधान केले होते. आम आदमी पार्टी आणि त्याचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांचे फुटीरतावादी घटक आणि खलिस्तान समर्थक लोकांशी संबंध असल्याचे कुमार विश्वास म्हणाले होते. या संदर्भात 12 एप्रिल रोजी पंजाबमधील रोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. कुमार विश्वास यांच्या अशा व्हिडिओ आणि विधानांमुळे पंजाबमधील शांततापूर्ण वातावरण बिघडू शकते, असे तक्रारीत म्हटले आहे.

वस्तुस्थिती व कायद्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. फिर्यादीच्या आधारे आम आदमी पार्टीच्या माजी नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 153, 153-ए आणि 505 अंतर्गत विश्वास यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 143, 147, 323, 341, 120-बी तसेच लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रोपरचे एसपी एच. एस. अटवाल यांनी स्पष्ट केले आहे.

अलका लांबांच्या निवासस्थानी नोटीस

एफआयआरमध्ये काँग्रेस नेत्या अलका लांबा यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यावर वेगवेगळय़ा वाहिन्यांना मुलाखती देऊन केजरीवाल यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. अलका लांबा यांच्या घरी पंजाब पोलिसांनी नोटीस चिकटवली आहे.

Related Stories

स्वीत्झर्लंडमध्ये सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम

Patil_p

रेल्वेचे जनरल डबेही होणार वातानुकुलित

Patil_p

सागर राणाच्या पीएम अहवालानंतर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

Archana Banage

सर्वसामान्यांना कर्जाच्या हप्त्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदत : RBI

datta jadhav

सुनावणी पुन्हा लांबणीवर

Patil_p

लघु पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ची ओडिशात यशस्वी चाचणी

Patil_p