Tarun Bharat

कुंभोज परिसराला सावकारीचा विळखा; समाजकारण-राजकारण करणारे लोक सावकारीच्या धंद्यात

Advertisements

बचत गटांचीही पिळवणूक ; खाजगी सावकारांच्या मुसक्या आवळण्याची गरज

कुंभोज/वार्ताहर (विनोद शिंगे)

कुंभोज येथील बेपत्ता असलेल्या संदीप सपकाळ प्रकरणामुळे पुन्हा एकदा खासगी सावकारीचा प्रश्न चर्चेत आला आहे. संदीपच्या नातेवाईकांनी तालुक्यातील दहा सावकारांच्या नावानिशी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार केल्याने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. परिणामी संदीप वगळता अन्य पैसे दिलेल्यांना खाजगी सावकार संपर्क करत असून एक महिन्याचे व्याज राहू दे पण मला तू फोन करू नको किंवा माझे नाव सांगू नको अशी विनवणी करत असल्याचे दिसत आहे. परिणामी येणाऱ्या काही दिवसात खाजगी सावकारकीची अनेक प्रकरणी बाहेर येण्याची शक्यता असून काही नामांकित व्यक्तीचा यामध्ये समावेश असल्याचेही उघड होणार आहे. दरम्यान, कुंभोज येथील बेपत्ता असलेला संदीपचा नातेवाईकांनी शोध घेतला असता तो अक्कलकोट येथे सापडला आहे. त्यामुळे सध्या तो घरी परतला आहे.

कुंभोजसह परिसरातील गावांमध्ये खासगी सावकारा बरोबर भिशीच्या नावाखाली व्याजाने पैसे देण्याचे मोठे जाळे पसरले आहे. येथे भिशीच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक सावकार चक्रवाढ व्याज लावून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करून भरमसाठ पैसे मिळवून आपले खिसे भरत आहेत. सावकारांच्या पठाणी वसुलीमुळे अल्प दरात सावकारांना घरे व जमीनी विकल्याची प्रकरणे ताजी आहेत. सावकारांच्या पिळवणुकीमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. झटपट पैसे मिळविण्याकडे अनेक तरूण आकर्षित होत आहेत. त्यामुळे अनेक तरुण सावकारांच्या गळाला लागत असून सावकारांकडून दोन ते तीन टक्क्यांनी रक्कम घेवून पुढे १० टक्क्यांनी वाटप करीत आहेत. झटपट पैसे मिळविण्याच्या नादात आता अनेक जण आडकले आहेत.

खाजगी सावकार सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या कर्जावर दंड व्याज, चक्रवाढ व्याज आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक केली करत आहेत. प्रसंगी धमक्या देऊन पैसे वसूल केले जात आहेत. वाढत्या व्याजाच्या भुर्दंडामुळे अनेकांना घर, शेती, घरातील वस्तू कर्ज व व्याजात गमावन्याची वेळ सर्वसामान्यावर आली आहे. त्यामुळे यांचावर नियंत्रण कधी येणार असा सवाल उपस्थित होत आहे. नाव बचत गटाचे पैसे मात्र खाजगी सावकारांचे असा प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहे.

बचत गटाच्या नावाखाली पंटरद्वारे प्रत्येक गावातील महिलांना एकत्र करून त्यांचा गट तयार करून अनेक सावकारांनी गावोगावी लाखो रुपये व्याजाने दिले आहेत. आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून एक दिवस ही रक्कम गोळा केली जाते. हप्ता चुकला किंवा उशीर झाला तर दंडापोटी मोठी रक्कम आकारण्यात येत आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार खाजगी सावकारांच्या गळाला लागले आहेत. त्यांच्या संपर्काचा फायदा घेत दारू, मटणाच्या पार्ट्या देऊन त्यांच्याशी जवळीक वाढविण्यात येत आहे. त्यांना कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते व कष्ट न करता तरुणांच्या हातात पैसे मिळत असल्यामुळे त्यांना चैनीची सवय लागली आहे. अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत.

तर कुंभोज येथे भिशीच्या नावाखाली लाखो रुपये काहीजण १० ते १५ टक्के व्याजाने पैसे देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हातकणंगले पोलिसांनी खाजगी सावकारकी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

कर्पेवाडी परिसरात हत्तीचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

अब्दुल लाट सरपंच अपात्र

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 6 मृत्यू, सक्रीय रूग्णांमध्ये घट

Abhijeet Shinde

किणीत एका रात्रीत तीन घरे फोडली; चोरट्यांनी ४ ते ५ लाखाचा ऐवज केला लंपास

Abhijeet Shinde

Kolhapur; शहरात शिवराज्याभिषेक दिनी शिवप्रतिमेची मिरवणूक उत्साहात

Abhijeet Khandekar

‘शिरोली आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामात हलगर्जीपणा’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!