

प्रतिनिधी /खानापूर
अंजलीताई फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात कुप्पटगिरी संघाने तर महिला गटात गणेबैल संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत पुरुष गटात 92 संघानी तर महिला गटात 22 संघानी सहभाग दर्शविला होता.
या स्पर्धेतील पुरुष गटात भावकेश्वरी संघ कुप्पटगिरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला, द्वितीय क्रमांक जय हनुमान संघ गंदिगवाड तर तृतीय क्रमांक सम्राट युवक संघ कसबा नंदगड यांनी पटकाविला. त्यांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 57 हजार रु. बक्षीस देण्यात आले. वैयक्तिकमध्ये उत्कृष्ट रेडर (चढाईपटू) नागराज चिकोप गंदिगवाड, उत्कृष्ट पॅचर (पकड) विशाल पाटील कसबा नंदगड, सर्वोत्कृष्ट खेळाडू नामदेव पाटील कुप्पटगिरी यांना प्रो कबड्डीपटू सिद्धांत देसाई व रोहित कुमार यांच्या हस्ते धनादेश व चषक देण्यात आला. रात्री उशिरा कबड्डी स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.
शी लक्ष्मी संघ गणेबैल विजेता
महिला गटात गणेबैलच्या प्रथम श्री लक्ष्मी संघाने विजेतेपद पटकावले तर माउली संघ करजगी हलगा पंचायतने दुसरे, गुरुवर्य शामराव हायस्कूल इदलहोंड संघाने तिसरे, ताराराणी पीयू कॉलेज खानापूरने चौथे स्थान मिळविले. त्यांना अनुक्रमे 57 हजार, 41 हजार, 31 हजार, 21 हजार रु. चे बक्षीस देण्यात आले. वैयक्तिकमध्ये रेडर (चढाईपटू) सदप सनदी करजगी, उत्कृष्ट पॅचर (पकड) धनश्री गुरव गणेबैल, सर्वोत्कृष्ट खेळाडू आकांक्षा गणेबैलकर ताराराणी कॉलेज खानापूर यांना पारितोषिक देण्यात आले.
खेळाकडे स्पर्धा म्हणून पाहू नका : सिद्धार्थ देसाई
याप्रसंगी खेळाडूना मार्गदर्शन करताना सिद्धार्थ देसाई म्हणाले, मीही तुमच्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील असून कबड्डी या खेळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर चमकलो आहे. तुम्ही खेळाकडे स्पर्धा म्हणून न पाहता खेळ म्हणून पहा. हार, जीत याकडे दुर्लक्ष करुन आपला सराव करत रहा, निश्चितच खानापूर तालुक्यातून राष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार होतील.
राष्ट्रीय खेळाडू तयार होतील : रोहितना विश्वास
याप्रसंगी रोहित कुमार म्हणाले की, ‘खानापूरसारख्या ठिकाणी कबड्डी खेळ पाहण्यासाठी जमलेली गर्दीच मला या खेळावर जनतेत असलेले प्रेम दिसून आले. मी देशाच्या अनेक भागात कबड्डीच्या माध्यमातून फिरत आहे. मात्र असा उत्साह आणि कबड्डीपटू मी प्रथमच पाहिले. त्यामुळे मला खानापूर तालुक्यातून निश्चित राष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रो कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई तसेच यूपी योद्धाचे रोहित कुमार, परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, विनायक मांगळेकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.
विकासासाठी कोणत्याही त्यागास तयार : अंजली निंबाळकर
मी जरी जन्माने कोल्हापूरची असलो तरी आता खानापूरच्या मातीत रुळले आहे. खानापूर हीच माझी कर्मभूमी आहे. माझ्या कर्मभूमीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी कोणत्याही त्यागास तयार आहे. माझा अखेरचा श्वास याच कर्मभूमीत जाईल, अशी ग्वाही आज देत आहे, असे प्रतिपादन आमदार अंजली निंबाळकर यांनी केले.