श्रीनगर / वृत्तसंस्था
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी कुपवाडा आणि कुलगाम येथे दोन वेगवेगळय़ा चकमकी झाल्या. कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत जम्मू काश्मीर पोलीस आणि 28 आरआर आर्मीचे जवान सहभागी झाले होते. दुसरीकडे, कुलगामच्या डीएच पोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. लष्कर आणि पोलिसांच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत या कारवाईबाबत अधिक माहिती देण्यात आली नव्हती.
गुप्तचर विभागाकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत मिळालेल्या माहितीनंतर कुपवाडा पोलीस आणि 28 आरआर आर्मीच्या जवानांनी रविवारी जिह्यातील लोलाब भागात संयुक्त दहशतवादविरोधी अभियान राबवले. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. त्याचवेळी आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने रात्रीपर्यंत सदर भागात कारवाई सुरू ठेवण्यात आली होती.