वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सी. ए. कुट्टाप्पा यांची भारतीय पुरुष मुष्टीयुद्ध संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची घोषणा अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या अध्यक्षांनी केली आहे.
या फेडरेशनचे संचालक बर्नांर्ड डय़ुने यांच्या सल्ल्यानुसार भारतीय पुरुष मुष्टीयोद्धय़ांसाठी कुट्टाप्पा यांची प्रमुख प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी म्हणजे 2021 च्या ऑक्टोबरमध्ये सेनादल क्रीडा संस्थेचे नरेंद्र राणा यांच्याकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता राणा यांच्या जागी कुट्टाप्पा यांची नियुक्ती केली जात आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्धय़ांची कामगिरी असमाधानकारक झाल्याने अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने प्रशिक्षक वर्गामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मुष्टीयुद्ध या क्रीडा प्रकारात भारताच्या एकाही पुरुष मुष्टीयोद्धय़ाला पदक मिळवता आले नाही. अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशन आणि कुट्टाप्पा यांच्यात हा नवा करार 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिकपर्यंत करण्यात आला आहे. पतियाळामध्ये सध्या भारतीय मुष्टीयोद्धय़ांसाठी सराव शिबिर चालू असून या शिबिरात शिवा थापा, मोहमद हुसामुद्दीन, रोहित टोकास आणि सागर यांचा समावेश आहे. या शिबिरामध्ये आता कुट्टाप्पा यांचे मुष्टीयोद्धय़ांना मार्गदर्शन लाभणार आहे. 2018 ते 2021 या कालावधीत कुट्टाप्पा यांच्याकडे पहिल्यांदा प्रमुख प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा मुष्टीयोद्धा अमित पांगलने विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. 18 ते 27 फब्रुवारी दरम्यान होणाऱया स्ट्रेंजा स्मृती महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचा दुय्यम संघ पाठवला जाणार आहे. युरोपमधील ही सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे 15 मार्चपासून महिलांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा सुरू होणार आहे. बल्गेरियात होणाऱया या स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि टोकियो ऑलिम्पिक कास्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेन सहभागी होणारी नाही.