दोघेही नातेवाईक, खूनाचे कारण अस्पष्ट


प्रतिनिधी /वास्को
सांकवाळच्या मेटास्ट्रीपजवळ सोमवारी मध्यरात्री दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन खूनात झाले. हा खून अनैतिक संबंधातील वादातून झाल्याचा संशय आहे. खून झालेला एक मजूर असून त्याचे नाव संजय यादव (35) असे आहे. तर संशयित आरोपीचे नाव कन्हैय्यालाल यादव असे आहे. हे दोघेही एकमेकांचे नतेवाईक असून मूळ उत्तर प्रदेशातील असलेले मयत आणि संशयीत झुरीन झुआरीनगर येथील राहणारे आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत मजूर आहे तर संशयित ट्रकचालक आहे. मयत संजय हा संशयित आरोपीचा मामेभाऊ आहे. या दोघांमध्ये कोणत्या तरी विषयावरून झुआरीनगरमध्ये ट्रकमध्येच वाद झाला. यावेळी रागाच्या भरात संशयित कन्हैयालाल याने मयत संजयच्या डोक्यावर धारधार हत्याराने वार करून त्याला ठार केले. त्यानंतर सकाळी 4 वा.च्या सुमारास त्याचा मृतदेह त्याने झुआरीनगर वेर्णा महामार्गावरील मेटास्ट्रीप कंपनीसमोरील निर्जन्यस्थळी नेला व त्या ठिकाणी त्याने बांधकाम साहित्याच्या ढिगाऱयाखाली लपवून ठेवला. त्यामुळे या घटनेचा बराच वेळ कुणाला सुगावा लागला नाही. परंतु सकाळी 10 वा.च्या सुमारास काही व्यक्तींना त्या ढिगाऱयाखाली मृतदेह असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी वेर्णा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतरच या खूनाचा उलगडा झाला.
पोलिसांनी मयत व्यक्तीबद्दल चौकशी केली असता तो झरीन झुआरीनगरातील असल्याचे उघडकीस आले. सोमवारी रात्री तो कन्हैयालाल याच्यासोबत होता असेही चौकशीत आढळून आले. मयताच्या पत्नीला घटनास्थळी आणून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी संशयित कन्हैयालाल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो सावर्डे भागात ट्रकमध्ये माल भरण्याच्या कामात व्यस्त होता. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन घटनास्थळी आणले व त्याच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. संजयचा खून आपण केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्याला खूनप्रकरणी अटक केली आहे. मात्र, या खूनाचे कारण उघड झालेले नाही. अनैतिक संबंधाच्या विषयावरून वाद झाल्याचा संशय असला तरी पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. वेर्णाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासिएस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
परप्रांतीय चालक वाहकांच्या उपद्रवावर नियंत्रण हवे
दरम्यान, झुआरीनगर ते उपासनगर या पट्टय़ात रात्रीच्या वेळी मालवाहू ट्रकांचा संचार असतो. बरेच ट्रक या महामार्गाशेजार पार्क केले जातात. सर्व चालक व वाहक हे परप्रांतीयच असतात. रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत त्यांचे वाद व हाणामाऱयाही होत असतात. अपघातही घडत असतात. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे नाहक सांकवाळ परिसराचे नाव बदनाम होत असल्याने या गैरप्रवृतींवर पोलिसांनी नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.