Tarun Bharat

लगीन गाठ….

Advertisements

हॅलो..रात्री साडेअकरा वाजता सदाशिवरावांना फोन आला. ‘बाबा मी आता इथे राहणार नाही. लगेच निघा आणि मला घेऊन चला’. मुग्धा हुंदके देतच बोलत होती.

मनिषने फोन घेतला आणि म्हणाला, ‘काका खूप समजावले मुग्धाला..ऐकत नाही. एवढय़ा रात्री ती निघाली आहे. तुम्ही प्लीज आलात तर बरं होईल.’

मुग्धा आणि मनिष. लग्नाला जेमतेम तीन वर्षे झाली आहेत. त्यांना दीड वर्षांची खूप गोड मुलगी आहे. लग्न झाल्यापासून काही ना काही कुरबुरी सुरूच होत्या. एकदा मुग्धा माहेरी निघूनही गेली होती परंतु सदाशिवरावांनी तिची समजूत घालून तिला परत पाठवले होते. आता पुन्हा तेच घडत होते अर्थात नवरा बायकोच्या नात्यात, वादविवाद, रुसवे हे नवीन नाही. अशा संदर्भातले अनेक फोन आणि भेटायला येणारी जोडपी पाहून शेजारच्या काकू मला म्हणाल्या, ‘हल्ली ही भांडणं, संसार तुटणं फार होतंय का गं.. आमच्या मृणालची काळजी वाटते. तिचा स्वभावही तसा तापट आहे. मृणालचं सासरी कसं काय व्हायचं याची काळजी वाटते. लग्न झालं. हुश्श..! असं करण्याइतकी आजच्या काळातली लगीनगाठ सोपी राहिली नाही असंच काहीसं समीकरण झाल्यासारखं वाटतं ना..’ त्या म्हणाल्या.

वैवाहिक विसंवाद हा विषय आता अधिकाधिक महत्त्वाचा होतो आहे. पती पत्नीचे नाते इतर कुठल्याही नात्यापेक्षा भिन्न आहे. म्हणूनच या नात्यामध्ये तणाव उत्पन्न होण्याची शक्मयता अधिक असते. तसे पाहिले तर वैवाहिक विसंवादाला शेकडो कारणे असतात.

1) पती पत्नी यांच्यामधील सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक पातळीमधे असलेले मोठ्ठे अंतर

2) स्वभाव, आवडीनिवडी अतिशय भिन्न असणे एकमेकांच्या परस्परविरोधी. स्वतःचेच म्हणणे खरे करायचा हट्ट

3) स्वभावदोष, व्यक्तिमत्त्वातील कमतरता, कमकुवतपणा, विकृती

4) सासू-सून वाद, सासर-माहेर मतभेद

5) शारीरिक, मानसिक आजार, व्यसने

6) लैंगिक समस्या

7) आर्थिक बाबींवरील वाद, मुलांच्या संगोपनाविषयी मतभेद

8) विवाहबाह्य संबंध, चारित्र्याविषयी संशय

9) एकमेकांकडून केल्या जाणाऱया अवास्तव अपेक्षा

10) शारिरीक-मानसिक त्रास

अशा एक ना अनेक कारणांवरून पती पत्नीमध्ये तंटे, खटके, भांडणे होत असतात. अर्थाजन, मुलांचे संगोपन, कामातील मदत, त्याचे वाटप किंवा वरील अनेक मुद्यांवरून जोडप्यात दुमत होऊ शकते परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळेही अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्यामुळे या नात्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते. कामाच्या अनियमित वेळा. पती पत्नीचे कामांचे वेळापत्रक. म्हणजे काहीवेळा पत्नी घरी येते तर पतीची बाहेर पडायची वेळ झालेली असते किंवा या उलटही.. पगार भरपूर असतो. परंतु कामाच्या वेळा आणि कामाचा रगाडा यामुळे माणूस प्रचंड थकलेला असतो. अनेकदा दोघांमध्ये संवाद होत नाही. अनेकदा संवाद नाही हेच विसंवादाचे कारण ठरते. काही केसेसमधे असेही पहायला मिळते की लग्न कधी करायचे याबाबत मनात गोंधळ असतो. आपल्याला नेमके काय करायचे आहे, ध्येय काय याबाबत काही विचार नसतो. चला लग्न उरकून टाकू म्हणून लग्न केले जाते. अनेकदा नात्यांची फिल्मी समीकरणे डोक्मयात एवढी फिट्ट बसलेली असतात की ‘तो’ किंवा ‘ती’ तसे वागले नाही तर पती-पत्नीचे एकमेकांवर प्रेमच नाही अशा समजुतीतूनही वादविवाद आणि नात्यामधे दरी निर्माण होते.

 आजच्या बदलत्या काळानुसार या नात्यासमोर वेगवेगळी आव्हाने उभी आहेत. चला लग्न झालं.. हुश्श सुटलो.. असे म्हणून चालणार नाही. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे कागदोपत्री नोंदणी झाली.. चला काम झाले असे म्हणून चालणार नाही, तर ते नाते भक्कम ठेवण्यासाठी पती पत्नी दोघांनाही श्रम घ्यावे लागतील.

अनेकदा अशीही जोडपी भेटतात की ज्यांना लग्न होताक्षणी जोडीदाराने बदलायला हवे हा अट्टहास दिसतो. एकमेकांच्या सहवासात काही काळ गेल्यानंतर हळूहळू बदल होतो. आणि तो होण्यासाठी आधी जो फरक आहे त्याचा स्वीकार करण्याची मनोवृत्ती असायला हवी. खरंतर असे कोणतेही नाते नाही की ज्यामधे मतभेद असणार नाहीत, वादळे येणार नाहीत. जोडप्यांमध्येही दुमत, मतभेद होणारच. कारण दोघांचे दृष्टिकोन, त्यांना मिळालेले वातावरण, संस्कार हे वेगवेगळे असतात. हे लक्षात घ्यायला हवे. तसेच एकमेकांशी बोलताना, संवाद साधताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, नाहीतर क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद मनभेदापर्यंतचा प्रवास करताना दिसतात.

1. आपले म्हणणे मांडताना दुसऱयाला समजेल अशा भाषेत, स्पष्टपणे मांडायला हवे. याबाबतीत माझ्याकडे आलेल्या अनुश्री आणि आरव या जोडप्याचे उदाहरण सांगता येईल. पहा हं,. आरव ऑफिसमधून आल्यावर किती गरम होत आहे असे म्हणत खुर्चीत बसतो. अनुश्री पाणी आणून देते आणि गरम गरम चहा घेऊन येते. झालं..चहा बघताक्षणी आरवच्या कपाळावर आठय़ा पडतात. थोडा आवाज वाढवतच..‘काय गं, इतकं गरम होतंय आणि चहा कशाला?’ अनुश्री खट्टू होते. आता पहा..या वाक्मयापेक्षा आरवने ‘अनुश्री, आज खूपच उकडतंय. चहाऐवजी आज सरबत कर.’ असे म्हटले असते तर?

2. आरवला ऑफिसमधून यायला उशीर झाला. येताक्षणी अनुश्री, ‘काय हो वाजले किती?’ बघा हं, हा प्रश्न विचारून अनुश्रीला वेळ पहायची होती का? आरवने उत्तर दिले, ‘भिंतीवर आहे की घडय़ाळ..’ झालं वाद सुरू.. अशा प्रश्नापेक्षा, ‘आज खूपच उशीर झाला. हरकत नाही. पण उशीर होणार असेल तर फोन करा. मला काळजी वाटते.’ अर्थात यातून आरवला अनुश्रीला वाटणारी काळजी समजेल.

3. अनुश्री आरवला म्हणते ‘अहो..त्या आपल्या शेजाऱयांनी नवी कोरी गाडी घेतली. तुमचे ज्युनिअर ना ते?’ याचा अर्थ आपण गाडी कधी घेणार असा होतो. परंतु तशी इच्छा व्यक्त करायची असेल तर मोकळेपणाने बोलवे. (शेजाऱयांनी घेतली म्हणून नव्हे) ‘आपण गाडी कधी घेणार?’ अशी तुलना न करताही विचारता येते.

4. अनुश्री छान साडी नेसून तयार होते. सांगा ही साडी कशी आहे? यामधे अर्थातच तिला या साडीत मी कशी दिसते? माझी निवड कशी आहे हे ऐकायचे असते..आरव म्हणतो, ‘छॅ..हा कसला बकवास रंग..तुला अज्जिबातच शोभत नाही.’ पहा हं..त्याऐवजी ‘अनुश्री तुला निळा रंग फारच आवडतो ना. छान आहे. पण गुलाबी रंग अधिक खुलून दिसतो बघ’ असे म्हणता येईल.

अर्थात तू तुला याऐवजी मला हे आवडतं हां असेही म्हणता येते. ‘तू अमुक गोष्ट करत नाहीस, तुला हे जमतच नाही..घरात ढीगभर पसारा..’ याऐवजी ‘मला ना, घर अगदी नीटनेटकं आवडतं. ए, या रविवारी आपण सगळय़ांनी गप्पाटप्पा करत सारं आवरुया..’ हे अधिक चांगलं. जोडप्यामध्ये संवाद असणे, संवाद होत असताना तो विसंवादाकडे वळणार नाही ना याची काळजी घेणे, न बोलताही एकमेकांचे मन वाचण्याचा आग्रह न धरणे यासारख्या काही गोष्टी सजग रहात केल्या तरी सहजीवनाचा प्रवास सुकर होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित!!

-ऍड. सुमेधा संजीव देसाई

Related Stories

राजकीय मोर्चेबांधणी अन् एसीबीच्या अडचणी

Amit Kulkarni

दिल्ली दूर नही..!

Patil_p

एक चांगली बातमी

Patil_p

कोरोना आणि आपण

Patil_p

मज फूलही रुतावे…

Patil_p

परमात्मस्वरूप

Patil_p
error: Content is protected !!