हजारोंच्या साक्षीने पहाटे केले अग्निदिव्य मार्गक्रमण. जत्रोत्सव अमाप उत्साहात आणि अलोट गर्दीत साजरा. चार दिवशीय कौलोत्सवाला प्रारंभ.
डिचोली / प्रतिनिधी
आपल्या भावंडांसमोर देवी लईराईने केलेला अग्निदिव्याचा पण अखेर काल शुक्रवारी पहाटे पूर्ण केला. आपल्या असंख्य धोंडगणांनंतर स्वतः अग्निदिव्य मार्गक्रमण करून देवी थेट चव्हाटा येथे रवाना झाली. हा देवीचा पण प्रत्यक्ष डोळय़ात टिपण्यासाठी शिरगावात हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. सर्वांच्या तोंडावर अमाप उत्साह ओसंडून वाहत होता. देवीच्या अग्निदिव्य मार्गक्रमणानंतर जत्रोत्सवाची सांगता झाली. तर चार दिवस कौलोत्सव चालणार आहे.
शिरगावातील देवी लईराईच्या जत्रोत्सवाला मोठय़ा उत्साहात आणि दिमाखात प्रारंभ झाला होता. सकाळीपासूनच शिरगावात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. दुपारी मंदिरातून बाहेर काढून मुड्डी येथे मूळ आदिस्थानात नेण्यात आलेली चिरा (देवीची उत्सवमूर्ती) रात्री 8.30 च्या सुमारास नाचत गाजत पूर्ववत मुख्य मंदिरात आणण्यात आली. रात्री देवीचा कळस असंख्य धोंडगणांच्या उपस्थितीत मंदिरातून बाहेर काढण्यात आला. कळसाने होमकुंडाला अग्नी दिल्यानंतर देवीचा कळस पवित्र तळीवर स्नानासाठी गेला.
कळस तळीवर गेल्यानंतर सर्व धोंडगणांनी होमकुंडाला देवीच्या नामघोषात प्रदक्षिणा मारली आणि धोंडाणही पवित्र तळीवर स्नानासाठी रवाना झाले. देवीच्या स्नानानंतर कळस मुड्डी येथे मंदिरात ठेवण्यात आला. धोंडगणांनी तळीवर स्नान केल्यानंतर मुड्डी येथे मंदिरात उपस्थिती लावली. तेथे धोंडगणांना देवीचा प्रसाद म्हणून मोगरीचा कळा देण्यात आला. सदर कळा तोंडात ठेऊन सर्व धोंडगण अग्निदिव्य मार्गक्रमणासाठी सज्ज झाले.
होमकुंडातील सर्व लाकडे पेटून निखारे तयार होऊ लागताच सदर निखारे एकख बाजूने काढून थर रचण्यास प्रारंभ झाला. एका बाजूने निखाऱयांचा थर तयार होताच धोंडगणांनी अग्निदिव्य मार्गक्रमणास प्रारंभ केला. रात्री अडीच वा. च्या सुमारास धोंडगणांच्या मार्गक्रमणास प्रारंभ झाला होता. पहाटेपर्यंत सर्व धोंडगणांनी अग्निदिव्य पार केल्यानंतर पहाटे देवीच्या कळसाने अग्निदिव्य पार करून आपला पण पूर्ण केला.
अग्निदिव्य पार केल्यानंतर देवीच्या कळसाने थेट चव्हाटा येथे कुच केली. पहाटे कळस चव्हाटा येथे ठेवण्यात आला. दुपारपर्यंत शिरगावात आलेल्या भाविकांना कळसाचे चव्हाटा येथे दर्शन घेतले. तर संध्याकाळी देवीच्या कौलोत्सवाला प्रारंभ झाला. कळस थेट मानसवाडा येथे दाखल झाला आणि येथून भाविकांच्या घरांना भेटी देण्यास प्रारंभ केला. देवीचे आपापल्या अंगणात स्वागत करण्यासाठी भाविकांंनी चांगलीच तयारी केली आहे. सोम. दि. 9 मे पर्यंत शिरगावात कौलोत्सव चालणार आहे. तर.सोमवारी रात्री विधीवतपणे देवी मंदिरात प्रवेश करणार आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यावषी राज्यभरातील आणि राज्याबाहेरील देवीच्या भाविकांना कौल घेण्याची संधी मिळणार असल्याने शिरगावात हे चारही दिवस भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.