सुरेश तिळवे यांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान : जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत पणजीतील पाणीपुरवठा बंद राहणार
प्रतिनिधी /पणजी
पणजी भाटले रस्त्यावर सांडपाण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असताना तेथील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवाय या भागातील रहिवाशी सुरेश तिळवे यांच्या घरात हे पाणी घुसल्याने त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. या प्रकारामुळे आज गुरुवारी पणजी शहराला पाण्याचा तुटवडा भासणार आहे.
भाटले ते चिंचोळे येथे गे कित्येक दिवस सांडपाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ड्रिलिंग करताना मुख्य जलवाहिनीला धक्का बसला व वाहिनी फुटून पाण्याचा फवारा उडाला. पाण्याचा दाब वाढल्यामुळे रस्ता खचून पाणी रस्त्यावरून वाहू लागले. यामुळे तेथील कामगारही गायब झाले. दरम्यान, त्याच परिसरात राहणारे सुरेश तिळवे यांच्या घरात पाणी घुसून पाठीमागच्या शेतात पाणी गेले. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला माहिती मिळताक्षणी संबंधित अभियंत्याने ओपा पाणी प्रकल्पाला याची माहिती देऊन पाणी पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या.
हे पाणी रस्त्यावर पसरले असल्यामुळे वाहतुकीची केंडी निर्माण झाली होती. रस्ता खचल्यामुळे वाहतून मारुती गड व इतर मार्गावर वळविण्यात आली होती.सदर मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणजी शहरात तसेच आसपास परिसरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे. जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत लोकांचे हाल होण्याची शक्यता आहे. पाणी पूर्णपणे सुकल्यानतंरच जलवाहिनीची दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती अभियंता दिगंबर नाईक यांनी दिली.
युद्धपातळीवर दुरुस्ती काम हाती घेणार!
सदरचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेतले जाईल. मात्र ही जलवाहिनी सुमारे साठ वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे याची योग्य प्रकारे पाहणी करूनच नवीन पाईप जोडावे लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सप्रेश कवळेकर, विभव पै, साहाय्यक अभियंता सुनिल शेट तसेच सांडपाणी वाहिनी टाकणाऱया ठेकेदार कंपनीचे हरिष जकाजी हे काम करून घेणार आहेत, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यात भाटलेमर्गे पणजीत येणाऱया वाहन चालकांनी सांतइनेज मार्गे किंवा अल्तिनोमार्गे आपली वाहने वळवावी, अशी सूचना अभियंता दिगंबर नाईक यांनी यावेळी दिली.