किदाम्बी श्रीकांत, त्रीसा-गायत्री, अश्विनी-सिक्की रेड्डी स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ टोकियो
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपउपांत्यपूर्व फेरी गाठली तर एचएस प्रणॉयनेही धक्कादायक निकाल देताना दोन वेळचा माजी चॅम्पियन जपानच्या केंटो मोमोटावर मात केली. मात्र किदाम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन व धुव कपिला यांनीही उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांना दुसऱया फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले.
लक्ष्य सेनने लुईस पेनल्व्हरवर 21-17, 21-10 अशी मात केली. पहिल्या गेममध्ये लुईसने चांगला प्रतिकार केला. पण दुसऱया गेममध्ये लक्ष्यने पूर्ण वर्चस्व राखत विजय साकार केला. लक्ष्यने 4-6 असे पिछाडीवर पडल्यानंतर सलग सात गुण मिळवित ब्रेकपर्यंत आघाडी घेतली. स्पेनच्या लुईसने ही आघाडी दोन गुणांनी कमी केली. पण लक्ष्यने दोन वेगवान रॅलीज जिंकून 18-14 अशी बढत घेतली आणि एका अप्रतिम स्मॅशवर लक्ष्यने हा गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये लक्ष्यने लुईसला वरचढ होण्याची संधीच दिली नाही.
प्रणॉयचा मोमोटाला धक्का
एचएस प्रणॉयने जबरदस्त प्रदर्शन करीत जपानच्या केंटो मोमोटावर 21-17, 21-16 अशी मात करीत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. प्रारंभापासूनच प्रणॉयने आक्रमक खेळावर भर दिला आणि अखेरपर्यंत मोमोटाला स्थिरावण्याची संधी दिली नाही. मोमोटालाही अलीकडे फॉर्मसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.
के. श्रीकांतला मात्र दुसऱया फेरीत पराभवाचा धक्का बसला. झाओ जुनपेंगकडून तो 9-21, 17-21 असा पराभूत झाला. 34 मिनिटे चाललेल्या या लढतीच्या दुसऱया गेममध्ये श्रीकांत 16-14 असा आघाडीवर होता. तो हा गेम जिंकणार असेच वाटले होते. पण झाओने इथून पुढे झटपट गेम व सामना संपवत श्रीकांतला स्पर्धेबाहेर घालविले.
पुरुष दुहेरीत बिगरमानांकित एमआर अर्जुन व धुव कपिला यांनी डेन्मार्कच्या आठव्या मानांकित किम ऍस्ट्रप व अँडर्स स्कारुप रासमुसेन यांना 21-17, 21-16 असा पराभवाचा धक्का देत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. त्यांची पुढील लढत सिंगापूरच्या ही याँग काइ टेरी व लोह कीन हीन यांच्याशी होणार आहे.
तत्पूर्वी, महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनाही पराभवाचा धक्का बसला. पीयर्ली टॅन व थिनाह मुरलीधरन या मलेशियन जोडीकडून त्यांना 8-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मलेशियन जोडीने पहिला गेम केवळ 14 मिनिटांत संपवताना त्रीसा-गायत्रीला स्थिरावण्याची संधीच दिली नाही. दुसऱया गेमच्या प्रारंभी भारतीय जोडीने थोडाफार प्रतिकार करताना रॅलीजवेळी संयम तर काही वेळा आक्रमकताही दाखविली. पण मलेशियन जोडीकडे त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला प्रत्युत्तर होते. त्यांनी दुसऱया गेमसह सामना जिंकून आगेकूच केली. त्रीसा-गायत्री यांच्याप्रमाणे अश्विनी व सिक्की रेड्डी यांनाही दुसऱया फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या अग्रमानांकित चेन किंग चेन व जिया यिफान यांनी त्यांना 21-15 21-10 असे हरवित पुढील फेरी गाठली. याशिवाय पूजा दंडू व संजना संतोष यांनाही पराभव स्वीकारावा लागला. कोरियाच्या तिसऱया मानांकित ली सो ही व शिन सेयुंग चॅन यांच्याकडून त्या 15-21 7-21 असे पराभूत झाल्या