वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम (इंग्लंड)
येथे सुरू असलेल्या 2023 च्या अखिल इंग्लंड खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान पुरुष एकेरीत संपुष्टात आले. गुरुवारी झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या अँटोनसेनने लक्ष्य सेनचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या टॉप सिडेड पी. व्ही. सिंधूचे महिला एकेरीतील आव्हान यापूर्वी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या अँटोनसेनने 19 व्या मानांकित लक्ष्य सेनचे आव्हान 21-13, 21-15 असे संपुष्टात आणत पुढील फेरीत स्थान मिळवले. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत लक्ष्य सेनने उपविजेतेपद मिळवले होते. गेल्या वर्षी त्याला अंतिम सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसनकडून पराभव पत्करावा लागला होता. अँटोनसेनने आता विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या या सुपर 1000 स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
त्रीसा-गायत्रीची आगेकूच
या स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रीसा जॉली यांनी जपानच्या फुकुशिमा आणि सायाका हिरोटाचा 21-14, 24-22 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गायत्री आणि त्रीसा या जोडीने कांस्यपदक पटकावले होते. आता गायत्री आणि त्रीसा या जोडीचा पुढील फेरीत सामना चीनच्या झुआन आणि मेई यांच्या बरोबर होणार आहे.
या स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या पेंग आणि चेंग या जोडीने सात्विक साईराज आणि शेट्टी यांचा 10-21, 21-17, 21-19 असा पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत तसेच एच. एस. प्रणॉय यांनाही यापूर्वी हार पत्करावी लागली आहे. इंडोनेशियाच्या गिनटिंगने एच. एस. प्रणॉयचा 22-20, 15-21, 21-17 तसेच जपानच्या नाराओकाने किदाम्बी श्रीकांतचा 21-17, 21-15 असा पराभव केला.