ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात वैष्णवी पाटील या डान्सरने लावणीचे व्हिडिओ शूट केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्याविरोधात अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ यासारख्या अन्य संघटनांनी पुण्यात निषेध आंदोलन केले. भाजप नेत्यांकडूनही याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडीओ शूट प्रकरणी वैष्णवी पाटीलसह चौघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे.
वैष्णवी पाटीलने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रेष्ठ जिजाऊंच्या लाल महालात चंद्रा लावणीवर डान्स व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करताना त्यावर वाद होईल असं काहीच माझ्या मनीध्यानी आलं नव्हतं. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ बनवायला गेले होते. कुणाचंही मन दुखावण्याचा, शिवप्रेमींचं मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी स्वतः एक शिवप्रेमी आहे. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली हे मला कळलं. ज्या क्षणी मला माझ्याकडून चूक झाली हे कळलं त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलीट केला होता. परंतू मी तो व्हिडीओ डिलीट करण्याआधीच माझ्या चाहत्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला. मी सर्वांना सांगू शकत नाही, पण मी माझ्या चाहत्यांना व्यक्तिगतपणे तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत आहे.
https://www.instagram.com/tv/CdyTF-eD5T6/?igshid=YmMyMTA2M2Y=
माझ्याकडून लालमहालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली. ही चूक मी मान्य करते. सर्व शिवप्रेमी आणि माझ्या चाहत्यांची मी माफी मागते. तसेच जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला धक्का बसेल असा माझा हेतू नव्हता. मला मराठी मुलगी असल्याचा अभिमान आहे. मी शिवकन्या आहे. माझ्याकडून पुन्हा अशा प्रकारची चूक होणार नाही.