सीबीआय न्यायालयाचा दिलासा : उपचारासाठी सिंगापूरला जाणार
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडच्या रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पासपोर्ट परत करण्याचा आदेश दिला आहे. लालूप्रसाद यांनी पासपोर्ट परत मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी या अर्जावर सुनावणी करत लालूप्रसाद यांना पासपोर्ट परत करण्याचा आदेश दिला आहे.
लालूप्रसाद यादवांना चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. अडीच वर्षे तुरुंगवास भोगल्यावर लालूप्रसाद यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जामिनाच्या अटीनुसार त्यांना पासपोर्ट न्यायालयात जमा करावा लागणार आहे. तसेच न्यायालयाच्या अनुमतीद्वारेच ते पासपोर्ट परत मिळवू शकतात आणि त्याचा वापर करू शकतात.
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सिंगापूरमध्ये उपचारासाठी जाण्याकरिता न्यायालयाने लालूप्रसाद यांचा पासपोर्ट परत करण्याचा आदेश दिला होता. सिंगापूरमध्ये लालूप्रसाद यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती. लालूप्रसाद यादव हे पुन्हा एकदा आरोग्य तपासणीसाठी सिंगापूर येथे जाणार आहेत.
उपचारासाठी विदेशी जाण्यापूर्वी लालूप्रसाद यांना सीबीआय न्यायालयाला कळवावे लागते. त्यानंतरच सीबीआय न्यायालयाकडून त्यांचा पासपोर्ट परत केला जातो. यापूर्वी सिंगापूरमधून परतल्यावर लालूप्रसाद यांनी स्वत:चा पासपोर्ट न्यायालयात जमा केला होता.