शस्त्रक्रियेनंतर तासाभरात आले शुद्धीवर, संभाषण सुरू
सिंगापूर / वृत्तसंस्था
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सोमवारी यशस्वी झाली. सिंगापूर येथील रुग्णालयात जवळपास एक तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तासाभरात ते शुद्धीवर आल्याचे सांगण्यात आले. त्यांची मुलगी रोहिणीने लालूंना किडनी दान केली आहे. सध्या दोघेही आयसीयूमध्ये उपचार घेत असून दोघांवरही किमान चोवीस तास वैद्यकीय अधिकाऱयांची नजर राहणार आहे. त्यांच्यावरील किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया 3 डिसेंबरपासून सुरू झाली होती. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये लालूंवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
लालूंचा धाकटा मुलगा आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत वडील शुद्धीवर आल्याची माहिती दिली आहे. ‘असंख्य लोकांच्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार’ असा संदेशही त्यांनी व्हिडिओसोबत जोडला आहे. कन्या मीसा भारती यांनीही सोशल मीडियावर पोस्ट टाकत वडील ठीकठाक असल्याची माहिती पक्ष कार्यकर्ते आणि निकटवर्तियांना दिली आहे. तसेच या शस्त्रक्रियेपूर्वी कन्या रोहिणीने लालूंसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.