वृत्तसंस्था/ नॉर्दम्प्टन (ब्रिटन)
यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात पाच गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली. इंग्लंड संघातील फलंदाज एम्मा लॅम्बने शानदार शतक झळकविले. तसेच नॅट स्किव्हरने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 47.4 षटकात 218 धावात आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 32.1 षटकात 5 बाद 219 धावा जमवित विजय नोंदविला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावात सी. ट्रायोनने 73 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारासह 88, डी क्लर्कने 53 चेंडूत 2 चौकारासह 38, वुलवर्टने 72 चेंडूत 3 चौकारासह 43, स्टेनने 2 चौकारासह 14, कॅपने 2 चौकारासह 12 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये 5 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यांच्या डावात 3 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे नॅट स्किव्हर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 59 धावात 4 तर ब्रंटने 18 धावात 3, इक्लेस्टोन आणि डीन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात सलामीची फलंदाज एम्मा लॅम्बने आक्रमक खेळी करताना 97 चेंडूत 15 चौकारासह 102 धावा झळकविल्या. स्किव्हरने 36 चेंडूत 8 चौकारासह 55, डंकलेने 3 चौकारासह 22, कर्णधार नाईटने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, वॅटने 3 चौकारासह नाबाद 14 धावा जमविल्या. लॅम्ब आणि स्किव्हर यांनी तिसऱया गडय़ासाठी 89 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी लॅम्ब आणि डंकले यांनी दुसऱया गडय़ासाठी 78 धावांची भर घातली होती. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 31 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे डी क्लर्कने 2, केप, खाका आणि सेखुकु यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 47.4 षटकात सर्वबाद 218 (ट्रायोन 88, वुलवर्ट 43, स्टेन 14, केप 12, डी क्लर्क 38, स्किव्हर 4-59, ब्रंट 3-18, इक्लेस्टोन आणि डीन प्रत्येकी एक बळी), इंग्लंड 32.1 षटकात 5 बाद 219 (लॅम्ब 102, डंकले 22, स्किव्हर 55, नाईट 20, वॅट नाबाद 14, डी क्लर्क 2-44, केप, खेका, सेखुकुने प्रत्येकी एक बळी).