Tarun Bharat

जुलैमध्ये मोपावर ‘लँडिंग-टेक ऑफ’ची ट्रायल!

Advertisements

केवळ 10 टक्केच काम शिल्लक : सप्टेंबरपासून विमानसेवेला सुरुवात,मुख्यमंत्री डॉ.सावंत यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

देशातील एक महत्वकांक्षी प्रकल्प ठरलेल्या मोपा विमानतळ प्रकल्पाचे 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून जुलैमध्ये या प्रकल्पामध्ये पहिले विमान ट्रायल म्हणून उतरणार आहे तर प्रत्यक्षात 1 सप्टेंबरपासून या प्रकल्पातून विमानसेवा सुरु होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळ प्रकल्पाचे एकंदरीत झालेले बांधकाम आणि त्याची तयारी या अनुषंगाने शुक्रवारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत कृषीमंत्री रवी नाईक हे देखील उपस्थित होते. तसेच विमानतळ प्रकल्पाचे संचालक शानभाग आणि या प्रकल्पाचे कंत्राटदार, जीएमआर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

धावपट्टी, रडारसह यंत्रणा सज्ज

बैठकीनंतर दैनिक तरुण भारतशी बोलताना डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले आहे. बहुतांश सारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. धावपट्टीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. रडार यंत्रणा देखील कार्यान्वित झाली आहे.

जुलैमध्ये होणार पहिली ट्रायल

आता केंद्राकडून रितसर सर्व परवाने मिळणे आवश्यक आहे. तसेच उर्वरित 10 टक्के बांधकाम आणि तयारी ही जून अखेर पूर्ण होईल. त्यानंतर जुलैमध्ये या प्रकल्पास्थळी ट्रायल म्हणून विमान उतरविण्यात येईल आणि टेकऑफ करूनही पाहिले जाईल. 1 सप्टेंबरपासून या विमानतळाच्या धावपट्टीवरून विमाने धावू लागतील.

विमानतळाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी

 विमानतळ प्रकल्पाचे 15 ऑगस्टच्या दरम्यान उद्घाटन करावयाचे असल्याने त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. केवळ 10 टक्केच काम शिल्लक राहिलेले आहे ते देखील जून अखेर किंवा जुलैच्या मध्यास पूर्ण होईल. विमानतळ प्रकल्प ते राष्ट्रीय महामार्गदरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या चालू आहे. ते देखील लवकरच पूर्णत्वास येईल. या आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक विमानतळावर बोईंग व 380 पद्धतीची एअरबसेस विदेशातून थेट गोव्यात येऊ शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

नोकरीत कायम करा अन्यथा प्रखर आंदोलन

Amit Kulkarni

पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका

Amit Kulkarni

कला सागर सांस्कृतिक केंद्राचा वर्धापनदिन साजरा

Omkar B

लोकमान्य सोसायटीच्यावतीने लोकमान्य गणरंग चित्रकला स्पर्धा

Amit Kulkarni

ग्राहकांना तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टलची सोय

Amit Kulkarni

एक तृतीयांश फेरी विक्रेत्यांना घेऊन म्हापसा बाजारपेठ सुरू करणार

Patil_p
error: Content is protected !!