आरबीआयकडून दिलासाजनक आकडा : 9 महिन्यांच्या उच्चांकावर
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या विदेशी चलन साठ्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 7 एप्रिल रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात विदेशी चलन साठ्यात 6.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. अशाप्रकारे विदेशी चलन साठा आता मागील 9 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार 7 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठा वाढून 584.755 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तत्पूर्वी 31 मार्च रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात हे प्रमाण 578.45 अब्ज डॉलर्स इतके झाले होते.
तसेच 7 एप्रिल रोजी आठवड्यादरम्यान भारताचा सुवर्णसाठा आणि एसडीआर होल्डिंग देखील वाढले आहे. यादरम्यान सुवर्णसाठा 1.4 अब्ज डॉलर्सने अधिक होत 46.969 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तर एसडीआर म्हणजेच स्पेशल ड्रॉइंग राइट्समध्ये 58 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. एसडीआर आता 18.450 अब्ज डॉलर्ससमान झाले आहे. अशाचप्रकारे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा केलेला राखीव निधी 13 दशलक्ष डॉलर्सने वाढून 5.178 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
भारताचा विदेशी चलन साठा ऑक्टोबर 2021 मध्ये स्वत:च्या उच्चांकावर पोहोचला होता. तेव्हा हा आकडा 645 अब्ज डॉलर्सच्या पार झाला होता. त्यानंतरपासून विदेशी चलन साठ्यात घट होत राहिली आहे. विविध प्रतिकूल घटकांमुळे भारतीय चलनाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झाले आहे. यामुळे विदेशी चलन साठ्यातही घट झाली आहे. ऊपयाचे मूल्य सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक वेळोवेळी स्वत:कडील विदेशी चलन साठा खर्च करत असते.