वृत्तसंस्था/ मुंबई
शेअरबाजारात समाविष्ट होणाऱ्या लार्ज कॅप कंपन्या व मिड कॅप कंपन्यांकरीता बाजार भांडवल मूल्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. याअंतर्गत शेअरबाजारात सामील होणाऱ्या लार्ज कॅपमधील कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य कमीत कमी 84,325 कोटी इतके मर्यादीत असणार आहे तर मिड कॅपसाठी ही मर्यादा कमीत कमी 27,564 कोटी रुपयांची असणार आहे. म्युच्युअल फंडांची संघटना एम्फी यांच्या मागणीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
2023 मध्ये लार्ज कॅपकरीता 67,000 कोटी रुपये आणि मिडकॅपकरीता 22000 कोटी रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. पण आता ही बाजार भांडवल मूल्याची मर्यादा 25 टक्के इतकी वाढवण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजार 2021 नंतर वेगाने दौडताना दिसतो आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहित बाजाराचे प्रदर्शन दमदार राहिलेले आहे. यावर्षी जानेवारी ते जून या दरम्यान निफ्टी-50 19 टक्के आणि बीएसई सेन्सेक्स 9.4 टक्के इतका वाढला आहे. याचदरम्यान मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांची कामगिरी तर उल्लेखनीय राहिली आहे.
मिडकॅप, स्मॉलकॅपचे प्रदर्शन
मिडकॅप निर्देशांक 25 टक्के आणि स्मॉल कॅप 22 टक्के इतका वाढला आहे. समभागांच्या सहामाहीतील कामगिरीचा आढावा एम्फी यांनी नुकताच घेतला होता. त्यावर त्यांनी संशोधन केले आणि नंतरच नवी मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. सेबी या बाजारातील नियामक संस्थेनुसार बाजार भांडवलात 100 कंपन्या लार्ज कॅपमध्ये येतात तर त्यानंतर 101 ते 250 कंपन्या या मिडकॅप आणि त्याखालील कंपन्या स्मॉलकॅप गटात येतात..
7 कंपन्या लार्ज कॅपमध्ये…
7 मिड कॅप कंपन्या लार्ज कॅप गटात सामील झाल्या आहेत. यात हिरो मोटोकॉर्प, झायडस लाइफसायन्सेस, जेएसडब्ल्यू एनर्जी, एनएचपीसी, बीएचईल, संवर्धन मदरसन आणि बॉश यांचा समावेश झाला आहे.
19 समभाग मिडकॅपमध्ये….
याचदरम्यान जवळपास 19 कंपन्या या मिडकॅपमध्ये सामील झाल्याची माहिती आहे. नव्याने सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचा यात सहभाग राहिला आहे. यात भारती हेक्साकॉम आणि गो डिजिट जनरल इन्शुरन्स यांचा समावेश आहे. याशिवाय 7 समभाग जे स्मॉलकॅप गटात होते ते आता मिड कॅपमध्ये सामील झाले आहेत. केपीआर मिल्स, टाटा केमिकल्स, नारायण हृदयालय आणि सन टीव्ही नेटवर्क यांचा स्मॉलकॅपमध्ये समावेश झालाय.