श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सज्जाद तंत्रे याचा खात्मा करण्यात आला. अनंतनागच्या बिजबेहारा येथील चेकी दुडू भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करी जवानांनी या भागाला वेढा घालून संयुक्त कारवाई केली. चकमकीपूर्वी दहशतवाद्याला शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्याने शरणागती न पत्करता सुरक्षा पथकावर गोळीबार केल्याने त्याला चकमकीत ठार करण्यात आले. त्याच्याकडून महत्त्वाचा दस्तावेज आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.