पुणे : देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती केल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) एका तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इनामूल हक उर्फ इनामूल इम्तियाज (वय १९, रा. पटना, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) असे पोलीस कोठडी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ (अ), १५३ (अ), २०१ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इनामूलवर उत्तर प्रदेशातील देवबंद पोलीस ठाण्यातही या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. ‘एटीएस’ने देवबंद न्यायालयातून शुक्रवारी (१० जून) इनामूलची ट्रान्झिट रिमांड घेऊन सोमवारी त्याला विशेष न्यायालयात हजर केले.
‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध असल्याच्या संशयावरून ‘एटीएस’ने यापूर्वी जुनैद महंमद अता महंमद (वय २८, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, जि. बुलडाणा) आणि आफताब हुसैन शाह (वय २८, रा. किश्तवार, जम्मू काश्मीर) यांना अटक केली आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’ दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी जुनैदने इनामूलची ओळख या प्रकरणातील एका आरोपीशी करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जुनैद हा इनामूलशी ‘दुरानी’ या नावाने संपर्कात होता. या प्रकरणातील आरोपीने दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी पैसे पाठवले होते. ते पैसे वापरून जुनैदने इनामूलला भरतीसाठी तयार केले होते, अशी माहिती ‘एटीएस’ने न्यायालयास दिली. इनामूल, जुनैद आणि अन्य आरोपी देशात गर्दीच्या ठिकाणी घातपात व दहशतवादी कृत्य करणार होते, असे तपासात प्रथमदर्शनी दिसून आले आहे. घातपाती कारवायांचा कोणता कट त्यांनी रचला होता, याच्या तपासासाठी पोलिसांनी न्यायालयात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली.