वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाला सर्वाइकल कॅन्सरच्या विरोधात पहिली स्वदेशी व्हॅक्सिन मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियाकडून निर्मित ह्यूमन पेपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) व्हॅक्सिन लाँच केली आहे. ही लस सर्वाइकल कॅन्सरपासून लोकांचा बचाव करणार असल्याचे शाह यांनी यावेळी म्हटले आहे.
एचपीव्ही व्हॅक्सिन तयार करण्यासाठी सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे तज्ञ अनेक महिन्यांपासून कार्यरत होते. सुमारे 5 महिन्यांपूर्वी ‘क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन’ नावाने ही लस तयार करण्यात आली होती. आता एचपीव्ही व्हॅक्सिनला अधिकृतपणे सादर करण्यात आले आहे. भारतात तयार झालेली अशाप्रकारची ही पहिली लस आहे.
या स्वदेशी लसीद्वारे लोक सर्वाइकल कॅन्सरपासून बचावू शकतील. सर्वाइकल कॅन्सर विशेषकरून महिलांसाठी अधिक घातक असतो. सर्वाइकल कॅन्सरची बहुतांश प्रकरणे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या विविध प्रकारच्या स्ट्रेन्समुळे उद्भवतात. एचपीव्ही व्हॅक्सिनच्या किमतीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. ही लस बाजारात उपलब्ध करण्याची तयारी केली जात आहे. ही लस याप्रकारातील अन्य लसींच्या तुलनेत स्वस्त असेल आणि याची किंमत 200 ते 400 रुपयांदरम्यान असू शकते असा दावा करण्यात येत आहे.