‘एसएसएलव्ही-डी2’ दुसऱया प्रयत्नात यशस्वी, स्पेस स्टार्टअपच्या ‘आझादी सॅट-2’चा समावेश
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपले सर्वात छोटे रॉकेट ‘एसएसएलव्ही-डी2’चे प्रक्षेपण शुक्रवारी केले. स्मॉल सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकलचे (एसएसएलव्ही) प्रक्षेपण शुक्रवारी सकाळी 9.18 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून झाले. ‘एसएसएलव्ही-डी2’ने तीन उपग्रह सोडण्यात यश मिळवले. हे रॉकेट लाँच करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. याआधी 9 ऑगस्ट 2022 रोजी पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
‘एसएसएलव्ही-डी2’ने प्रक्षेपित केलेल्या 3 उपग्रहांमध्ये अमेरिकेचा जानूस-1, चेन्नईतील स्पेस स्टार्टअपचा ‘आझादी सॅट-2’ आणि इस्रोच्या ईओएस-7 (पृथ्वी निरीक्षण उपग्रह) यांचा समावेश आहे. ‘एसएसएलव्ही-डी2’ने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 15 मिनिटे उड्डाण केल्यानंतर उपग्रहांना 450 किमी अंतराच्या कक्षेत सोडले आहे. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी ‘एसएसएलव्ही-डी2’च्या प्रक्षेपणानंतर आनंद व्यक्त करत इस्रोच्या टीमसह तिन्ही उपग्रहांच्या निर्मितीमध्ये हातभार लावणाऱया टीमचे अभिनंदन केले आहे. ‘आता आमच्याकडे नवीन प्रक्षेपण वाहन आहे. ‘एसएसएलव्ही-डी2’ने दुसऱया प्रयत्नात उपग्रहांना कक्षेत यशस्वीरित्या सोडले आहे. तिन्ही उपग्रह संघांचे अभिनंदन’, असे ट्विट त्यांनी केले आहे.
लहान उपग्रह प्रक्षेपणाचे उद्दिष्ट
‘एसएसएलव्ही-डी2’ विकसित करण्याचा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणे हा आहे. यासोबतच पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकलचा (पीएसएलव्ही) वापर आत्तापर्यंत प्रक्षेपणात मोठय़ा प्रमाणात केला जातो. ‘एसएसएलव्ही-डी2’मुळे ते आता मोठय़ा मोहिमांसाठी वापरले जाईलअसेल. ‘एसएसएलव्ही’ हे रॉकेट 10 ते 500 किलो वजनी उपग्रह किंवा वस्तू 500 किमी अंतरावरील प्लॅनर ऑर्बिटमध्ये यशस्वीपणे वाहून नेऊ शकते.
गेल्यावषी ‘एसएसएलव्ही’चे प्रक्षेपण अयशस्वी
9 ऑगस्ट 2022 रोजी ‘एसएसएलव्ही’ प्रक्षेपणाचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ते प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. रॉकेटचे प्रक्षेपण समाधानकारकपणे झाले होते. परंतु नंतर वेगात अडचण आली, तसेच रॉकेट विलग होण्यातही समस्या निर्माण झाली होती. दोन्ही समस्यांमुळे एसएसएलव्हीचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. त्यानंतर रॉकेटमधील दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत गेल्यानंतर त्यांचा काहीही उपयोग झाला नसल्याचे इस्रोने स्पष्ट केले होते.
‘एसएसएलव्ही-डी2’मधून रवाना झालेले उपग्रह….
‘ईओएस-07’ ः इस्रोने विकसित केलेला ‘ईओएस-07’ हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. 156.3 किलो वजनाचा हा उपग्रह आहे.
‘जानूस-1’ ः ‘जानूस-1’ हा 10.2 किलो वजनाचा अमेरिकन उपग्रह ‘एसएसएलव्ही-डी2’या रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यात आला आहे.
‘आझादी सॅट-2’ ः चेन्नईच्या स्पेस किड्झ इंडियाच्या नेतृत्त्वात देशातील 750 विद्यार्थिनींनी 8.7 किलो वजनाचा ‘आझादी सॅट-2’ हा उपग्रह तयार केला आहे.