वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रोजेक्ट 15बी गायडेड क्षेपणास्त्र प्रणालीतील ‘इंफाळ’ युद्धनौकेचे आज मंगळवारी जलावतरण केले जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि संरक्षण मंत्रालय आणि मणिपूर सरकारचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. ‘इंफाळ’ ही युद्धनौका लांब पल्ल्याचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे. दोन दिवसांपूर्वीच याची यशस्वी चाचणीदेखील झाली आहे. या युद्धनौकेला पूर्वोत्तर राज्यातील शहराचे नाव देण्यात आले आहे. ही युद्धनौका 23 डिसेंबर 2023 रोजी अधिकृतपणे नौदलात सामील होईल, असे भारतीय नौदलाने सांगितले.