कुर्डुवाडी/प्रतिनिधी
मला शिव्या का देता म्हणून वकीलाने आपल्या जन्मदात्या माता पित्याला काठीने मारहाण केली. याबाबत विष्णू गोविंद इंगळे (रा.कुर्डू ता.माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन संतोष विष्णू इंगळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवार दि. १ रोजी सायं ७ वा फिर्यादी व त्याची पत्नी घरासमोर उभे होते. त्यावेळी समोरच राहणारा वकील मुलगा संतोष हा तिथे आला आणि वडिलांना तुम्ही मला सारख्या शिव्या का देता असे म्हणत तुम्ही इथे रहायचे नाही म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी वकीलाची आई तिथे आली आणि तू वडिलांना का शिव्या देतोस त्यांनी तुला शिव्या दिल्या तरी ते वडिल आहेत म्हणून गप्प बस असे म्हणाली. त्यावर मुलाने आईला ढकलून जवळच पडलेल्या काठीने वडिलांच्या डोक्यात मारले. त्यावेळी भांडण सोडवायला गेलेल्या आईला देखील काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच तुम्हाला आता सोडले पुन्हा सोडणार नाही. तुम्ही इथे रहायचे नाही असे म्हणून निघून गेला.