वकील महिलेला मारहाणीचा निषेध : कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : वकील महिलेला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करीत शुक्रवारी वकिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. मारहाण करणारे पोलीस व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष अॅड. सचिन शिवण्णावर, अॅड. गिरीराज पाटील, अॅड. प्रवीण करोशी, अॅड. श्रीधर मुतगेकर, अॅड. पूजा पाटील, अॅड. हणमंत कोंगाली, अॅड. सुनील काकतकर, अॅड. संजय नावगेकर आदींसह बेळगाव बार असोसिएशनच्या बहुसंख्य वकिलांनी या आंदोलनात भाग घेतला. अयोध्यानगर येथील अॅड. कांचन आर. गवळी (वय 38) यांना शुक्रवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास टिळकवाडी पोलीस स्थानकात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. वैयक्तिक घटनेसंबंधी पोलीस स्थानकात बोलावून त्यांना मारहाण केल्याचा आरोप वकिलांनी केला. या घटनेची माहिती समजताच सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अॅड. कांचन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची भेट घेऊन वकील महिलेला मारहाण करणारे अधिकारी व पोलिसांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयासमोर वकिलांनी निदर्शने केली. सोमवारी बैठक घेवून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली. या घटनेसंबंधी पोलीस उपायुक्तांकडे रात्री लेखी तक्रारही करण्यात आली असून वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे. यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज कोठे जातात?
पोलीस उपायुक्तांशी चर्चा करताना टिळकवाडी पोलीस स्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज देण्याची मागणी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यापूर्वी अनेक घटनांत माहिती हक्काखाली अर्ज करूनही फुटेज दिले नाहीत. वकील व सर्वसामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस स्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज कोठे जातात? असा प्रश्न उपस्थितीत करून त्वरित फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.