कॅन्टोन्मेंटकडून परवानगी ; यंदेखूटपर्यंत जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. लक्ष्मीटेकडी परिसरातून शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्या घालण्यासाठी कॅन्टोन्मेंटची परवानगी आवश्यक होती. जलवाहिन्या घालण्यास कॅन्टोन्मेंटने परवानगी दिली नव्हती. मात्र फुटपाथसाठी असलेल्या जागेत जलवाहिन्या घालण्यास परवानगी देण्यात आल्याने जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहर आणि उपनगरात प्रमुख जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत कॅन्टोन्मेंट परिसरात जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिका व्याप्तीमधील 48 वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. यासाठी जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रापासून ठिकठिकाणी असलेल्या जलकुंभापर्यंत जलवाहिन्या घालण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या जलवाहिन्या घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्याची खोदाई करावी लागत आहे. त्यामुळे जलवाहिन्या घालण्यासाठी एलऍण्डटी कंपनीने कॅन्टोन्मेंट बोर्डकडे परवानगी मागितली होती.
त्यामुळे हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीच्या अजेंडय़ावर होता. जलवाहिन्या घालण्यासाठी परवानगी देण्यास कोणतीच हरकत नाही. पण चोवीस तास पाणीपुरवठा योजनेमध्ये कॅन्टोन्मेंटचा समावेश का करण्यात आला नाही? असा मुद्दा तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी उपस्थित केला होता. तसेच रस्ते करण्यासाठी निधी नाही. अशातच पुन्हा खोदाई केल्यास रस्त्यांची दुरवस्था होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे फुटपाथच्या जागेत जलवाहिन्या घालण्यास हरकत नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले होते. मात्र याबाबत चर्चा करून परवानगी देण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेतला होता. मात्र बैठक होण्यापूर्वीच जलवाहिन्या घालण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लक्ष्मी टेकडीपासून शर्कत पार्क तसेच रामघाट रोडमार्गे यंदेखूटपर्यंत जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.