रुग्णांबरोबरच नातेवाईकांनाही पावसात सहन करावा लागतोय त्रास : तातडीने दुरुस्ती करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वसामान्य जनतेला मोफत तसेच कमी दरात उपचार मिळावेत यासाठी सिव्हिल हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या गैरसोयींमुळे हे हॉस्पिटल कुचकामी ठरू लागले आहे. आता पावसाला जोरदार सुरुवात झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील अनेक विभागात पावसामुळे गळती लागली आहे. वास्तविक, उन्हाळय़ापूर्वीच त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पावसाळा येताच या गळतीची आठवण होत आहे.
सध्या सुरू असलेल्या या पावसामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरवषीच पावसाळय़ामध्ये ही समस्या निर्माण होत असते. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यातच थंड हवा आणि विभागात गळतीमुळे त्या ठिकाणी रुग्णांना राहणे अवघड झाले आहे. काही इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांना गळती लागली आहे. पावसाळय़ापूर्वी ती गळती काढणे गरजेचे होते. पण बिम्स प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. यामुळे आता अनेक विभागात पाणीच पाणी होत आहे. एक तर सर्वत्र दुर्गंधी आणि त्यामध्ये पाणी यामुळे रुग्णांना तेथे राहणे अवघड बनले आहे.
पाणी काढण्यासाठी कसरत
रुग्णाबरोबर असलेली व्यक्तीही यामुळे आजारी पडू लागली आहे. प्रसूती विभागाच्या तिसऱया मजल्यावर पावसामुळे अक्षरशः सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याचबरोबर मेडिकल विभागातही पाणी आले आहे. हे पाणी काढण्यासाठी नातेवाईकांनाच कसरत करावी लागत आहे. मात्र, हे पाणी काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी कोणताच प्रयत्न करण्यास तयार नाहीत. रुग्णांच्या खाटावरही पाणी पडू लागले आहे. यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रादेशिक आयुक्तांनी समज देऊन देखील दुर्लक्ष
सिव्हिल हॉस्पिटलची जबाबदारी आता प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांच्याकडे आहे. त्यांनी अनेकवेळा त्याठिकाणी भेट दिली आहे. डॉक्टर तसेच कर्मचाऱयांना त्यांनी मार्गदर्शन केले. तर काहींना समजदेखील दिली. मात्र संबंधितांनी इमारतींकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळेच आता पावसाळय़ामध्ये अनेक विभागांमध्ये पाणी गळती तशीच असल्याचे बोलले जात आहे.
सर्वत्र चिखलाचे साम्राज्य
सिव्हिल हॉस्पिटल आवारामधील सर्व रस्ते उखडून टाकण्यात आले आहेत. या रस्त्यांवर लाल माती पसरविण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्त्यावर काही प्रमाणात खडी टाकण्यात आली तरी ती खडी चिखलामध्ये रुतून गेली आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहने नेणेही अवघड बनले आहे.
जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष
सिव्हिल हॉस्पिटल आवारामध्ये पूर्वीच्या ज्या इमारती आहेत. त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते. नवीन इमारती उभ्या केल्या जात आहेत. मात्र जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जुन्या इमारतेंची अवस्था दयनीय झाली आहे, तेंव्हा तातडीने त्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सीसीटीव्ही बंद अवस्थेत
स्वच्छतागृह, शौचालय यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. पाणी नसल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरण्याचे प्रकार नित्याचेच आहेत. बऱयाच ठिकाणी कचरा तसाच पडून आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना त्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. या हॉस्पिटलमधील कामकाज पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे काही वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. पण ते कॅमेरे बसविल्यापासूनच बंद अवस्थेत आहेत. यामुळे खर्च करण्यात आलेले लाखो रुपये वाया गेले आहेत.