जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला दि. 3 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. 10 जानेवारीपर्यंत मुख्य यात्रा होणार आहे. त्यासाठी केएसआरटीसीने बस व्यवस्था करावी, यासाठी केएसआरटीसी अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी घेतली.
यावेळी यल्लम्मा यात्रेसाठी जिल्ह्यातील विविध भागातून अधिक बसेस सोडाव्यात, कोणत्याही प्रकारचा भक्तांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्या, यल्लम्मा डोंगरावर जाताना वाहतुकीचे नियम पाळत बसेस न्याव्यात, पार्किंग करताना इतर वाहनांना त्रास होऊ नये याची काळजीही घ्या, अशी जिल्हा पोलीसप्रमुखांनी अधिकाऱ्यांना सूचना केली.
यावेळी चिकोडी परिवहन वाहतूक विभागाचे शशिधर, बेळगावचे डीटीओ लमाणी उपस्थित होते. याचबरोबर रामदुर्ग आणि सौंदत्ती येथील पोलीस अधिकारीही या बैठकीला हजर होते. यात्रेबरोबरच सध्या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बसेसची संख्या कमी पडत आहे. तेव्हा बसफेऱ्या अधिक वाढवाव्यात. शाळा, महाविद्यालयांना ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू करा, असेही त्यांनी सांगितले आहे. 2 जानेवारीपासून निश्चितच बसफेऱ्या वाढविल्या जातील, असे आश्वासन परिवहनच्या अधिकाऱ्यांनी दिले.