प्रतिनिधी /बेळगाव
पाहणे, बोलणे, ऐकणे ही त्रिसूत्री लक्षात ठेऊन अभिनय केल्यास तो यशस्वी होतो, असे मत मुदगल प्रसाद पंडितराव यांनी व्यक्त केले. राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या अनुदान योजनेंतर्गत सरस्वती वाचनालय येथे ‘नाटय़ानुभव’ या विषयावर ते बोलत होते.
त्यांनी आतापर्यंत 12 नाटके आणि अनेक एकांकिका केल्या आहेत. त्यातील काही अनुभवांचे त्यांनी कथन केले. अभिनयासाठी मुळात आवड असणे महत्त्वाचे, असे ते म्हणाले. अरुण सरनाईक यांच्याबरोबर केलेल्या कामाची आठवण त्यांनी सांगितली.
वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी पंडितराव यांचा सत्कार केला. अरबोळे यांनी जी. बी. इनामदार यांचा सत्कार केला. अक्षता मोरे यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन सविता पारनट्टी यांनी केले.