Tarun Bharat

प्राथमिक शिक्षक बँक निवडणूकीत ‘डाव-प्रतिडाव’

बँकेच्या निवडणुकीसाठी रंगणार चुरशीची तिरंगी लढत
सत्ताधाऱयांकडून मांडला जातोय 12 वर्षातील कामाचा लेखाजोखा

कोल्हापूर/कृष्णात चौगले

जिह्यातील प्राथमिक शिक्षकांची मुख्य अर्थिक संस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधाऱयांसह विरोधकांची दोन पॅनेल मैदानात उतरल्यामुळे चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. सभासदांशी संपर्क साधण्यामध्ये सध्या सत्ताधारी वरुटे गटाने पूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. तर मंगळवारी झालेल्या माघारीनंतर सत्ताधाऱयांना कोणत्या मुद्यांवर कोंडीत पकडायचे याची रणनिती विरोधी आघाडीच्या नेत्यांनी आखली आहे. 3 जुलै रोजी मतदान होणार असल्यामुळे सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे.

बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली आहे. कोरोना महामारीमुळे त्यांना दोन वर्षांचा जादा कालावधी मिळाला. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शिक्षक संघटनांनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बँकेवर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी गटाने ताकद पणाला लावली आहे. पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’लं पुरोगामी समविचारी पॅनेलला शिक्षक समितीमधील तीन प्रमुख पदाधिकारी आणि थोरात गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांची साथ मिळाल्यामुळे भक्कम बांधणी झाली आहे. तर अनेक शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू स्वाभिमानी पॅनेलच्या माध्यमातून आपली ताकद पणाला लावली आहे. शिक्षक नेते जोतीराम पाटील, शिक्षक संघाचे (थोरात गट) जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, प्रमोद तैदकर, एक.के.पाटील, रघुनाथ खोत आदी प्रमुख पदाधिकारी शाहू पॅनेलची धुरा सांभाळत आहेत.

17 जागांवर विजय संपादनाचा सत्ताधाऱयांचा चंग

शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांची 13 वर्षापासून शिक्षक बँकेवर सत्ता आहे. या कालावधीत सभासद हिताच्या कोणकोणत्या योजना राबविल्या आहेत, याचा लेखाजोखा सत्ताधारी मंडळी सभासदांसमोर मांडणार आहेत. तर आम्ही सत्तेवर आल्यानंतर कशा पद्धतीने सभासद हिताच्या योजना राबवणार आहे हे विरोधी दोन्ही पॅनेलच्या नेत्यांकडून सभासदांना पटवून दिले जात आहे. गतनिवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत वरुटे गटाला 12 तर विरोधकांना 5 जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत 17 जागांवर विजय संपादन करण्याचा चंग सत्ताधाऱयांनी बांधला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पॅनेलमध्ये सर्व नवीन चेहऱयांना संधी देऊन सभासदांमध्ये एक वेगळा संदेश पोहोचवला आहे.

राजर्षी शाहू पॅनेलच्या प्रचारामध्ये तीन मुद्यांवर विशेष भर

राजर्षी शाहू स्वाभिमानी पॅनेलकडून प्रचारामध्ये तीन मुद्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. सभासदांकडे मतांचे दान मागताना बँकेत स्टाफींग पॅटर्न राबवणे, म्हणजेच बँकेचे कामकाज 112 कर्मचाऱयांऐवजी 99 कर्मचाऱयांवर चालवणे, कर्ज व्याज दर 9.50 टक्केपर्यंत कमी करणे, सभासदांना दोन अंकी टक्केवारीने डिव्हीडंट वाटप करणे हे तीन प्रमुख मुद्दे ठामपणे मांडले जाणार आहेत.

कर्ज व्याज दर एक अंकी, डिव्हिडंट उच्चांकी

प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी शिक्षक पॅनेलच्या वचननाम्यामध्ये सभासदहिताच्या अनेक योजनांचा समावेश आहे. कर्ज व्याज दर एकअंकी, डिव्हिडंट उच्चांकी, पारदर्शी, काटकसरीच्या कारभाराला प्राधान्य, राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सभासद सुविधा, मयत सभासद कल्याण निधीसाठी 15 लाखांची तरतूद करणे. सध्या ही तरतूद 5 लाख इतकी आहे. शैक्षणिक कर्जाचा व्याज दर 1 टक्के कमी करणे, बँकेचा व्यवसाय 2000 कोटीपर्यंत वाढवणे. सध्या तो 500 कोटी इतका आहे. बँकेचा दरमहा मासिक खर्च प्रसिद्ध केला जाणार आहे. या वचननाम्याशिवाय पुरोगामी शिक्षक संघटनेकडून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजकार्यासाठी गेल्या काही वर्षात कोणते योगदान दिले याचा अहवाल देखील पुरोगामी पॅनेलकडून सभासदांसमोर सादर केला जात आहे.

दहा दिवसांत उडणार प्रचाराचा धुरळा

शिक्षक बँकेसाठी 3 जुलै रोजी मतदान होत असून प्रचारासाठी 10 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. या कालावधीत निवडणूक रिंगणातील 56 उमेदवारांना 6 हजार 217 सभासदांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यासाठी फोनद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून आपल्याच पॅनेलला मतदान करण्याची उमेदवारांकडून विनवनी केली जात आहे.

Advertisements

Related Stories

हेळव्यांची चोपडी म्हणजे वंशावळीचे ‘डाटा सेंटर’

Abhijeet Shinde

कोल्हापूरात ‘बाप्पां’चे आज घरोघरी स्वागत

Abhijeet Shinde

मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा खून, मुलास जन्मठेप

Abhijeet Khandekar

शिक्षक मतदार संघातून उमेदवारीसाठी शिवाजीराव मोरे यांची जनसुराज्यकडे मागणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : नरबळीची कसून चौकशी करावी – अंनिस

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हद्दवाढीशिवाय पर्याय नाही : मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!