विविध ठिकाणी विक्री : जांभळांचीही आवक
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा वळीव आणि मान्सूनपूर्व पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने डोंगर भागात आणि शिवारात करवंदे, धामण आणि जांभळांना बहर आला आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. विशेषतः काळय़ा जांभळांची विक्री विविध ठिकाणी सुरू झाली आहे.
शहरातील काकतीवेस रोड, बसस्थानक, खडेबाजार, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी जांभळांची विक्री सुरू झाली आहे. पावसामुळे यंदा डोंगरातील काळी मैना लवकरच दाखल झाली आहे. आरोग्याला उपयुक्त असणाऱया जांभळांना मागणी वाढली असून, 200 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात जांभूळ आणि इतर रानमेव्यांची चव चाखता आली नव्हती. यंदा करवंदे आणि जांभूळ लवकरच दाखल झाल्याने मागणी वाढली आहे.
यंदा अधिक पाऊस झाल्याने डोंगर भागात रस्त्याकडेला करवंदे, धामण आणि जांभळांना बहर आल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी करवंदे आणि जांभूळ विकताना बाजारात दिसत आहेत. विशिष्ठ हंगामात करवंदे, जांभूळ आणि धामण मिळत असल्याने याला मागणी अधिक असते. पावसाळय़ाच्या तोंडावर या रानमेव्यांचे उत्पादन होत असते. दरम्यान, यंदा उन्हाळय़ात पाऊस अधिक झाल्याने रानमेव्यांची लागवड वाढली आहे. त्यामुळे बाजारातही रानमेवा ठिकठिकाणी नजरेस पडू लागला आहे.