16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सांगता, यापुढे फक्त क्लब क्रिकेट खेळणार
सेंट जॉन्स / वृत्तसंस्था
विंडीजचा सलामीवीर लेंडल सिमन्सने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ऑक्टोबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सिमन्सने ट्वीटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली.
‘7 डिसेंबर 2006 रोजी प्रथमच विंडीज क्रिकेट संघातून खेळलो, त्यावेळी आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द 16 वर्षे अव्याहतपणे सुरु राहील, याची मी कल्पनाही केली नव्हती. पण, तळमळ आणि बांधिलकी यामुळे हा सर्व प्रवास सहजपणे पार पडला. सर्व क्रिकेट प्रकारात 144 सामन्यात 3763 धावा जमवताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला’, असे सिमन्स पुढे म्हणाला.
‘माझे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराने मला प्रेरणा दिली आणि यामुळेच मी इथवर पोहोचू शकलो. ज्या-ज्यावेळी मैदानात उतरलो, त्या-त्यावेळी या सर्वांचे प्रतिनिधीत्वच मी जणू करत होतो. अनेक चढउतार आले. पण, या सर्व प्रवासात हे सर्व घटक ठामपणे माझ्या पाठीशी राहिले. प्रदीर्घकाळ खेळत राहता आले, यामागे त्या सर्वांचेच पाठबळ महत्त्वाचे होते’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
‘तरुणाईने मोठी स्वप्ने पाहण्यात काहीच गैर नाही. मार्गात कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करण्यासाठी करारी बाणा, एकाग्रता आणि मनोधैर्य अतिशय महत्त्वाचे असते’ असा सल्ला त्याने याप्रसंगी युवा खेळाडूंना दिला.
‘़क्रिकेटमुळे मला जगभर फिरता आले. दिग्गजांना भेटता आले आणि विभिन्न संस्कृतीचा अनुभव घेता आला. मी खेळात नेहमीच 100 टक्के योगदान दिले. पुरेपूर मेहनत घेतली. अगदी आताही स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता शक्य तितक्या कालावधीपर्यंत प्रँचायजी स्तरावरील क्रिकेट खेळण्याचा माझा प्रयत्न असेल’, असे सिमन्स येथे म्हणाला.
आयसीसी टी-20 विश्वचषक जेतेपदात सिमन्सचा सिंहाचा वाटा
विंडीजने 2012 व 2016 आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी सिमन्सचा वाटा महत्त्वाचा राहिला. 2016 वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत विंडीजने भारताला धूळ चारली, त्यावेळी सिमन्सचीच नाबाद 82 धावांची खेळी निर्णायक ठरली होती. सिमन्सने 8 कसोटीत 17.37 च्या सरासरीने 278 धावा, 68 वनडे सामन्यात 31.58 च्या सरासरीने 1958 धावा व 68 टी-20 सामन्यात 26.78 च्या सरासरीने 1527 धावांचे योगदान दिले.
लेंडल सिमन्सची कामगिरी
क्रिकेट प्रकार / सामने / धावा / सर्वोच्च / सरासरी / शतके / अर्धशतके
कसोटी / 8 / 278 / 49 / 17.37 / 0 / 0
वनडे / 68 / 1958 / 122 / 31.58 / 2 / 16
टी-20 / 68 / 1527 / 91ना. / 26.78 / 0 / 9.