गुरुवारी पुन्हा बिबटय़ाचे दर्शन : वनखाते हैराण : नागरिकांत हुरहूर-भीती कायम
प्रतिनिधी / बेळगाव
मागील 21 दिवसांपासून दहशत माजविलेल्या बिबटय़ाचे गुरुवारी दुपारी पुन्हा हिंडलगा मिलिटरी विनायक मंदिरजवळ दर्शन झाल्याने वनखात्याची झोप उडाली आहे. रेसकोर्स परिसरात दबलेला बिबटय़ा सातत्याने नजरेस पडत असल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटय़ासाठी वनखाते आणि पोलीस विभागाची सर्व यंत्रणा कामाला जुंपली असली तरी अद्याप त्यांना यश आले नाही. त्यामुळे बिबटय़ासाठी आता कोणता उपाय हाती घ्यावा, असा प्रश्न देखील सतावू लागला आहे. शिवाय बिबटय़ा कधी सापडणार? अशी हुरहूर देखील शहरवासियांना लागली आहे.
बुधवारी रेसकोर्स परिसरात प्रशिक्षित हत्तींच्या माध्यमातून बिबटय़ाचा शोध घेण्यात आला.
मात्र त्याला यश आले नाही. दरम्यान गुरुवारी हनुमाननगर डबल रोडला लागून असलेल्या रेसकोर्स परिसरात जेसीबीच्या माध्यमातून शोध सुरू असतानाच बिबटय़ा पळून जाताना नजरेस पडला आहे. त्यामुळे पुन्हा वनखात्याची तारांबळ उडाली आहे. सातत्याने चकवा देत असलेल्या बिबटय़ामुळे वनखाते हैराण झाले आहे.
बिबटय़ा कधी हाती लागणार?
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला आहे. 14 ट्रप कॅमेरे, 6 पिंजरे, ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून शोध सुरू आहे. दरम्यान सोमवारी क्लब रोडवर आलेला बिबटय़ा नियोजनाअभावी वनखात्याच्या हातातून निसटला. त्यानंतर मंगळवारी वनखात्याने आधुनिक ड्रोन कॅमेरे आणि मुधोळ श्वानाच्या माध्यमातून शोध घेतला होता. मात्र काहीच हाताला लागले नाही. बुधवारी शिमोगा येथील हत्ती पथकाला पाचारण करून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. दरम्यान गुरुवारी दुपारी रेसकोर्स परिसरात असलेल्या मिलिटरी क्वॉटर्सजवळ झाडीत लपलेला बिबटय़ा पुन्हा नजरेस पडला आहे. जेसीबीच्या आवाजाने त्याने पळ काढला आहे. त्यानंतर वनखात्याने शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही. रेसकोर्स परिसरात आसरा घेतलेला आणि वारंवार नजरेस पडत असलेला बिबटय़ा कधी हाती लागणार? याचीच चिंता शहरवासियांना लागली आहे.
बिबटय़ा पकडण्यासाठी पिंजऱयाचाच उपाय
रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेल्या बिबटय़ाला चोवीस तासांत पकडण्याच्या सूचना अधिकाऱयांना वनमंत्री उमेश कत्ती यांनी दिल्या होत्या. दरम्यान बिबटय़ाला पकडण्यासाठी विविध उपाय करून देखील वनखात्याला यश आले नाही. त्यामुळे वनखात्याचे अथक प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. बिबटय़ाला पकडण्यासाठी रेसकोर्स परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावून त्यामध्ये कुत्री आणि शेळय़ा बांधव्यात. त्यामुळे कुत्री आणि शेळय़ाच्या आवाजाने बिबटय़ा जवळ येईल आणि भक्ष्य म्हणून पिंजऱयात सापडेल किंवा पिंजऱया शेजारी ट्रप कॅमेऱयांची व्यवस्था केल्यास त्याचे लोकेशन समजण्यास मदत होईल. त्यामुळे बिबटय़ा पकडण्यासाठी पिंजऱयाचा उपाय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा देखील वन्यप्रेमी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
10 नंबर ट्रप कॅमेऱयामध्ये दिसली छबी…
बुधवारी रात्री रेसकोर्स परिसरात लावलेल्या एका ट्रप कॅमेऱयामध्ये बिबटय़ाची छबी कैद झाली आहे. 10 नंबर ट्रप कॅमेऱयामध्ये ही छबी कैद झाली आहे. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बिबटय़ाला पकडण्याचे आव्हान वनखात्यासमोर कायम आहे.