प्रतिनिधी / बेळगाव : रेसकोर्स परिसरातील बिबट्यासाठी शोध मोहिम सुरु असतानाच शनिवारी बसवन कुडची येथील शिवारात एका शेतकर्याला बिबट्या सदृश्य प्राणी दिसला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी बिबट्या नजरेस पडत असल्याने हा एकच बिबट्या आहे की, दुसरा बिबट्या आहे. याबाबतही अद्याप संभ्रम आहे. शिवाय बिबट्याचा कोणत्या ठिकाणी शोध घ्यावा, असा प्रश्न देखील वनखात्यासमोर आहे. शनिवारी शिवारात काम करत असताना तानाजी मुतगेकर या शेतकर्याला बिबट्या सदृश्य प्राणी निदर्शनास आला आहे. त्यामुळे हिंस्त्र प्राण्यामुळे गावात एकच चर्चा होती. वनखात्याने देखील दाखल होत संबंधीत शेतकर्यांकडून माहिती मिळविली.
दरम्यान आढळून आलेला हा हिंस्त्र प्राणी बिबट्या आहे की तरस याबाबत संभ्रम आहे. मागील 16 दिवसांपासून बिबट्याने रेसकोर्स परिसरात दहशत माजविली आहे. वनखाते आणि पोलीस खात्याची सर्व यंत्रणा बिबट्याच्या मागावर असून देखील अद्याप शोध लागला नाही. मात्र तालुक्यातील बेळवट्टी पाठोपाठ बसवन कुडची परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी नजरेस पडल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.
मागील आठवडय़ात मोदगा येथे तरस –
पश्चिम भागातील मोदगा या ठिकाणी मागील आठवडय़ात तरस आढळून आले आहे. बसवन कुडची येथे शनिवारी आढळून आलेले तरस असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र निदर्शनास आलेला शेतकरी तरस असल्याचे सांगत आहे. त्यामुळे बसवन कुडचीत आढळून आलेले तरस की बिबट्या याबाबत संभ्रम कायम आहे.