नागरिकांत भीतीचे वातावरण; कुत्र्याचा फडशा
वार्ताहर/ पाटण
पाटण शहरात गेल्या आठ दिवसांत दोनवेळा बिबटय़ाने मानवी वस्तीत दर्शन दिल्याने शेतकऱयांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. प्रांत कार्यालय परिसरात गत आठवडय़ात बिबटय़ाने कुत्र्याचा फडशा पाडला होता. त्यानंतर रविवारी 9 रोजी रात्री पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात बिबटय़ाने शिरकाव केला होता. याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱयांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. शहरात बिबटय़ाचे सातत्याने दर्शन होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटण शहरातील प्रांत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुमारे 100 मीटर अंतरावर शेतकरी विकास उलपे यांच्या शेतात साखळीने बांधलेल्या पाळीव कुत्र्याचा बिबटय़ाने गत आठवडय़ात पहाटे तीनच्या सुमारास हल्ला करून फडशा पाडला होता. त्यानंतर पुन्हा रविवारी 9 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पाटण ग्रामीण रुग्णालयात परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाले. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱयांनी तत्काळ याची माहिती वनविभागाला दिली.
वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. सदर बिबटय़ा हा भक्ष्याच्या शोधार्थ भरवस्तीत आला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. पाटण शहरात भरवस्तीत बिबटय़ा शिरल्याची माहिती सर्वत्र पसरताच नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतामध्ये जाण्यासाठीही शेतकरी धजावत नाहीत. पाटण शहराच्या आजूबाजूच्या परिसरात बिबटय़ाचे सातत्याने दर्शन होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने सदर बिबटय़ाला सापळा लावून जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.