Tarun Bharat

जाधवनगरात बिबटय़ाची दहशत

Advertisements

गवंडी कामगारावर बिबटय़ाचा हल्ला : शहरात घबराटीचे वातावरण, रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरूच

प्रतिनिधी /बेळगाव

बिबटय़ाने जाधवनगर परिसरात दहशत माजविल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. थेट मानवी वस्तीत घुसत बिबटय़ाने एका गवंडी कामगारावर हल्ला केल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे जाधवनगर परिसरात वन विभाग, पोलीस व अग्निशमन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. बिबटय़ा आला हे समजताच जाधवनगर परिसरात नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. सिद्राय लक्ष्मण निलजकर (रा. खनगाव) असे जखमी गवंडी कामगाराचे नाव आहे.

बेळगाव शहराचा भाग असणाऱया जाधवनगर येथील गणपती मंदिरच्या खालील बाजूस असणाऱया परिसरात बिबटय़ा आल्याचे समजताच जाधवनगर परिसरात दहशत पसरली. कामगारावर बिबटय़ाने हल्ला केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. परंतु ज्या ठिकाणी शोधमोहीम सुरू होती त्याठिकाणी दलदल व गवत असल्यामुळे शोधकार्य करणे कठीण होत होते.

अनुभवला थरार

घराचे बांधकाम सुरू असल्याने कामगार रस्त्यावर वाळू-सिमेंट टाकत होते. बिबटय़ाने झडप घालून सिद्राय लक्ष्मण निलजकर (वय 38) रा. खनगाव यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पाठीवर नखांचे ओरखडे उठले. बाजूलाच इतर कामगारही काम करत होते. त्यांनाही नेमके काय करायचे सुचले नाही. इतर कामगार पाहताच बिबटय़ाने तेथून पळ काढला. निलजकर यांच्यासोबत इतर कामगारांनी हा थरार अनुभवला.

बिबटय़ासाठी लावण्यात आला सापळा

बिबटय़ा जाधवनगर परिसरातच आहे, हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्यानंतर पोलीस व वनविभाग सतर्क झाले. वन विभागाचे गदग येथून बिबटय़ा पकडणारे पथक तातडीने बेळगावला रवाना झाले. तसेच या परिसरात बिबटय़ासाठी सापळा लावण्यात आला आहे. बिबटय़ाच्या हालचाली टिपता याव्यात यासाठी ड्रोन कॅमेऱयांचा वापर पोलिसांकडून केला जात होता. परिसरात असणारी दलदल व वाढलेले मोठे गवत यामध्ये बिबटय़ा लपला असल्याची शक्मयता स्थानिकांमधून व्यक्त होत होती.

वन्यजीवांचा वावर वाढला

दिवसेंदिवस जंगलतोड होत असल्यामुळे वन्यजीव शहरांकडे वाटचाल करीत आहेत. बेळगावलगत बिबटय़ा येणाचा हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वी हिंडाल्को परिसरात रानमांजराचा वावर होता. राजहंसगड येथे काही वर्षांपूर्वी बिबटय़ा निदर्शनास आला होता. बेळगावपासून काही अंतरावर असणाऱया कुदेमनी गावात वाघ दिसल्याने खळबळ माजली होती. जंगलांमध्ये शिकार मिळत नसल्यामुळे शहरातील भटकी कुत्री, जनावरे, प्राणी यांच्यासाठी वन्यजीव आता शहरापर्यंत येत आहेत.

संजीवनी कुटे (प्रत्यक्षदर्शी)

आमच्या घराच्या पत्र्यांवर मोठय़ा प्राण्याने उडी मारल्याचा आवाज आला. पाहण्यासाठी बाहेर आले तर बाजूच्या बिल्डिंगमध्ये बिबटय़ा पळत जाताना दिसला. समोर असणाऱया पोस्टमनकडे तो जात होता. पोस्टमनने बिबटय़ा येत असल्याचे पाहून समोरच्या घरात उडी घेतली. त्यामुळे बिबटय़ाने आमच्या घरासमोर बांधकाम करणाऱया एका कामगारावर हल्ला करून पुढे पळून गेल्याचा थरार संजीवनी कुटे यांनी सांगितला.

पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी रात्री एक पत्रक काढून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जाधवनगर येथे बिबटय़ा आढळून आला असून, नागरिकांनी रात्रीच्यावेळी बाहेर पडू नये, तसेच लहान मुलांना बाहेर सोडू नये. शनिवारी बॉक्साईट रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱयांनी सतर्क रहावे. कोणाला बिबटय़ा निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस कंट्रोलरूम अथवा वनखात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभागाकडून अधिकाऱयांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले असून, त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. राकेश अर्जुनवाड (आरएफओ)-मो. 9739295671, विनय गौडर (डीआरएफओ)-मो. 7022081277, मल्लिकार्जुन जे.-9743788585, सिद्धार्थ चलवादी मो. 7022826394 या क्रमांकांशी संपर्क साधावा.

..मुलगा बचावला परंतु धक्क्याने आई दगावली

आपल्या मुलावर बिबटय़ाने हल्ला केल्याचे समजताच दुर्दैवी मातेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. खनगाव येथील शांता निलजकर (वय 65) यांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यातून मुलगा बचावला, मात्र हा धक्का सहन न झाल्याने आईचा मृत्यू झाला.

शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास जाधवनगर येथे बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना घडली होती. गवंडी कामगार सिद्राय लक्ष्मण निलजकर यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केल्याने ते किरकोळ जखमी झाले. सिद्राय यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले. सिदाय यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केल्याचे त्यांची आई शांता यांना समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. या धक्क्मयातून त्या सावरू न शकल्यामुळे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.

Related Stories

कोरोनापासून सर्वांचे संरक्षण करा

Patil_p

जिजामाता चौकमध्ये वाहनधारकांची चौकशी

Patil_p

देवगिरी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

सधन कुटुंबीयांना बीपीएल रेशनकार्डे परत करण्याचे आवाहन

Omkar B

चिदंबर पिळणकरचे दिव्यांग जलतरण स्पर्धेत यश

Amit Kulkarni

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनपटावर कीर्तन

Amit Kulkarni
error: Content is protected !!