Tarun Bharat

बेळवट्टी परिसरात बिबटय़ा : शेतकरी भयभीत

Advertisements

कट्टेमाळ शिवारात वावर : आता शेती कशी करायची, याची शेतकऱयांना चिंता : वनखात्याने दखल घ्यावी

वार्ताहर /किणये

गेल्या दहा दिवसांपूर्वी बेळगावच्या जाधवनगर परिसरात दिसलेल्या बिबटय़ाने भीतीचे वातावरण पसरले असतानाच आता तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळवट्टी परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

बेळवट्टी येथील कट्टेमाळ शिवारात रविवार दि. 14 रोजी सकाळी 9.45 च्या दरम्यान शिवाजी पांडुरंग नलवडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास बिबटय़ा आला. शेतात भातपिकामध्ये युरिया खताची फवारणी करत असताना बिबटय़ा दिसल्याची माहिती शिवाजी नलवडे यांनी दिली आहे. हा बिबटय़ा एकदा नाही तर शिवारातून घरी परत येत असतानाही दिसला, असे त्यांनी सांगितले.

राकसकोप धरणाच्या बाजूलाच बेळवट्टी, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी या गावातील शेतकऱयांच्या शेतजमिनी आहेत. बेळवट्टी गावातील शेतकरी याला कट्टेमाळ शिवार असे म्हणतात. या शिवारात उसाचे पीक अधिक प्रमाणात घेण्यात आले आहे. तर काही मोजक्याच शेतकऱयांनी भातरोप लागवड केली आहे.

शिवाजी नलवडे, त्यांची पत्नी व मामी हे तिघेजण रविवारी सकाळी खताची फवारणी करण्यासाठी गेले होते. भातपिकाच्या बाजूलाच उसाचा मळा आहे. शिवाजी हे खत फवारणी करीत होते. केळीच्या झाडाच्या बाजूला ऊस पिकाच्या बांधाजवळ त्यांना आवाज ऐकू आला. त्यांनी बाजूला येऊन पाहिले असता बिबटय़ा दिसला आणि आपण घाबरून गेलो. गडबडीत खत व इतर साहित्य बाजूलाच टाकून तेथून पळ काढत गावी आलो, असे त्यांनी सांगितले. तसेच येत असताना मोबाईलमध्ये सदर बिबटय़ाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो काढला पण अंतर लांब असल्याने मोबाईलमध्ये बिबटय़ाचा फोटो व्यवस्थित आला नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय घरी परत येताना महिलांनीही बिबटय़ाला पाहिले. यामुळे आम्हाला दोनवेळा बिबटय़ा दिसला, असे ते सांगतात.

गावच्या शिवारात बिबटय़ा आला ही बातमी गावात वाऱयासारखी पसरली. हा डोंगर भाग असल्याने परिसरात अनेकवेळा विविध प्राण्यांचे दर्शन होते. बिबटय़ा दिसल्यामुळे शेतकऱयांसह गावकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बेळवट्टी ग्रा. पं. च्यावतीने जांबोटी वनखात्याच्या अधिकाऱयांना याबाबत माहिती देण्यात आली.

बैलूर परिसरात असलेले वनखात्याचे कर्मचारी मळू पिंगळे, आर. जे. पाटील व अन्य काही कर्मचारी बेळवट्टी गावात दाखल झाले. त्यांनी शिवाजी नलवडे यांना ज्याठिकाणी बिबटय़ा दिसला, त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. पायाचे ठसे दिसतात का ते पाहिले. मात्र, पाऊस व अधिक चिखल असल्याने बिबटय़ाचे ठसे निदर्शनास आले नाहीत, अशी माहिती ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलताना मळू पिंगळे यांनी दिली. तसेच ऊस पीक मोठय़ा प्रमाणात आहे आणि डोंगर भाग असल्याने कोणताही सुगावा लागला नाही, असेही वनखात्याच्या कर्मचाऱयांनी सांगितले.

रविवारपासून या भागातील शेतकरी भीतीच्या छायेखालीच आहेत. सदर शेतशिवारात जाण्यासाठी बेळवट्टी, बिजगर्णी, राकसकोप व कावळेवाडी येथील शेतकरी टाळत आहेत. आता या भागातील शेती करायची कशी, याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे.

Related Stories

कॅम्प येथे वृक्षांची तोड, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

Amit Kulkarni

स्मार्टसिटी योजनेतील रूग्णालयाची इमारत सज्ज

Patil_p

स्टार एअरची तिरूपती विमानसेवा आजपासून

Amit Kulkarni

पाणंद रस्ता बंद केल्याने शेतकऱयांची गैरसोय

Amit Kulkarni

हिंडलगा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

Patil_p

कोरोनाकाळात खासगी हॉस्पिटल्सनी सहकार्य करावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!