Tarun Bharat

संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्या!

पंतप्रधान मोदी यांचे विरोधी पक्षांना आव्हान, हिंवाळी अधिवेशनास प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. या अधिवेशनात सरकारच्यावतीने 16 नवी विधेयके मांडण्यात येणार आहेत. तसेच पाच प्रलंबित विधेयके संमत करून घेण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे. विरोधी पक्षांनी शांतता राखून कामकाज सुरळीत होण्यास साहाय्य करावे, असे आवाहन प्रथम दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना केले आहे.

अधिवेशनाचा प्रारंभ झाल्यानंतर मागच्या अधिवेशनापासून या अधिवेशनापर्यंतच्या कालखंडात दिवंगत झालेल्या खासदारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. संसदेचे कामकाज विनाअडथळा सुरळीत पार पडल्यास नव्या आणि तरुण खासदारांना बोलण्याची संधी मिळेल. त्यांना त्यांचे विचार सदनांमध्ये मांडता येतील. त्यासाठी कामकाज व्यवस्थित सुरू राहणे आवश्यक आहेत. सर्व संसदीय सदस्यांनी विविध विषयांवरील चर्चा निर्विघ्नपणे पार पाडण्यात सहकार्य करावे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

वेदना समजून घ्या

संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे येऊन ते बंद पडल्यास तरुण खासदारांना संसदेत बोलण्याचा अनुभव मिळत नाही. त्यांना बोलण्याची आणि चर्चांमध्ये सहभागी होण्याची अतिव इच्छा आहे पण संधी मिळत नसल्याने त्यांना अत्यंत वेदना होत आहेत. सर्व पक्षांनी या वेदना समजून घेऊन त्यांना आवश्यक ती संधी मिळू द्यावी. त्यातच साऱयांचे हित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राज्यसभेत स्वागत

पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेच्या सभागृहात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे स्वागत केले. धनखड नुकतेच उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. नियमानुसार राज्यसभेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. त्यांचे हे उपराष्ट्रपती या नात्याने प्रथमच संसद अधिवेशन आहे. बुधवारी सशस्त्र दलांचा ध्वजदिनही होता. त्याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली. भारत ही विरांची भूमी आहे. विशेषतः झुनझुनू हे क्षेत्र वीरभूमी म्हणून मानले जाते. या भूमीतून आलेले उपराष्ट्रपती या पदाचा कार्यभार सांभाळताना देशाच्या गौरवात भर घालतील, अशी भलावण त्यांनी केली.

अनेक नेत्यांची भाषणे

अधिवेशनाच्या प्रथमदिनी विविध विषयांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली. अनेक पक्षांच्या संसद सदस्यांनी त्यात भाग घेतला. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भाष्य केले. 2022 या वर्षात आतापर्यंत 180 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात यश आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

केवळ हिंदीत परीक्षा नाही

एसएससीची (कर्मचारी निवड आयोग) परीक्षा केवळ हिंदी भाषेत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. सरकार सर्व भाषांना समान न्याय देत असून कोणत्याही एका भाषेला झुकते माप दिले जात नाही. कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा विविध स्थानिक भाषांमध्ये घेतल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

कोरोना पिडीतांना साहाय्य

गेली दोन वर्षे झालेल्या कोरोनाच्या उद्रेकात भारतात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक मृतामागे केंद्र सरकारने 50,000 रुपये दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीने ही भरपाई देण्यात आली आहे. कोरोनाचा उदेक आता नियंत्रणात आहे. तथापि सरकार अद्यापही योग्य ती काळजी घेत असून नागरिकांनाही सावध ठेवण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली.

जी-20 ची अध्यक्षता प्रतिष्ठावर्धक

पुढील वर्षभरासाठी भारताला जी-20 संघटनेचे अध्यक्षपद मिळालेले आहे. ही बाब संपूर्ण देशासाठी अभिमानाची आहे. भारत आपल्या अध्यक्षपदाच्या काळात पर्यावरण संरक्षण, अन्न सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेसंबंधी कार्य संघटनेच्या अन्य सदस्य देशांच्या सहकार्याने करणार आहे. चीनच्या हालचालींकडे आमचे बारकाईने लक्ष असून चिंतेचे कारण नाही, अशी माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली.

Related Stories

लॉकडाऊन वाढणार ?

Patil_p

तृणमूलचे 41 आमदार पक्षांतरास सज्ज ?

Patil_p

उत्तर प्रदेशातही ओबीसी आरक्षणाचा पेच

Patil_p

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त

Patil_p

गोवा मद्य वाहतुक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तस्कराला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

अदानींनी अंबानी, झुकरबर्गलाही टाकलं मागे

Archana Banage