करवीर पोलीस प्रमुख उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांचे गणेशोत्सव मंडळ यांच्या बैठकीत केले आवाहन
कसबा बीड /प्रतिनिधी
गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव, त्यास राजकीय स्वरूप होऊ न देता साजरा करूया, पारंपारिक वाद्याचा व एक गाव… एक गणपती… या संकल्पनेचा विचार व्हावा, असे करवीर पोलीस प्रमुख उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांनी आवाहन केले. सार्वजनिक तरुण मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच जनरेटर व डॉल्बी चालक-मालक संघटना, करवीर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या गणेशोत्सवानिमित्त बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत करवीर पश्चिम भागातील अनेक मंडळांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
प्रतिवर्षी होणारा गणेशोत्सव हा सण साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव साजरा करताना मोठ्या मंडळांनी मिरवणूक मार्ग पाहणी करून त्या पद्धतीने स्टेज आकार व गणेशमूर्ती तयार करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून साऊंड सिस्टिम लावावी, मोठ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळासाठी योग्य तो ड्रेस कोड तयार करावा आदी सूचनांचे पालन करावे अशाही सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्या. धार्मिक कार्यक्रमास कोणतेही गालबोट लागू नये, आपला धार्मिक कार्यक्रम राजकिय न होता साजरा करूया, तसेच प्रशासनाच्या सूचनाचे पालन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल असे डॉल्बी साऊंड सिस्टिम अध्यक्ष संदीप माने यांनी सांगितले. येणारा गणेशोत्सव सर्वांना एकत्रित घेऊन, पोलीस प्रशासनास सहकार्य करत वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करूया असे मंगलमूर्ती तरुण मंडळ कोगेचे अध्यक्ष विश्वनाथ मोरे यांनी सर्व मंडळाच्या वतीने आपल्या मनोगतात सांगितले. एकंदरीत गणेशोत्सवानिमित्त आयोजित बैठकीमध्ये अत्यंत खेळीमेळीत पोलीस प्रशासनाच्या सूचना व त्याची अंमलबजावणी करायची असे मंडळाच्या माध्यमातून चर्चा झाली. या बैठकीमध्ये पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस प्रमुख संकेत गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच साताप्पा परीट यांच्या हस्ते श्री सुरज बनसोडे, आणि अर्चना पाटील यांच्या हस्ते श्रीमती गीता पाटील यांचाही पोलीस पाटील संघटने कडून सत्कार करण्यात आला. यावेळी करवीर पश्चिम भागातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.या बैठकीची प्रस्तावना पोलीस हवालदार अविनाश पोवार यांनी स्वागत पोलीस उपनिरीक्षक गीता पाटील तर आभार प्रदर्शन पोलीस कॉन्स्टेबल सचिन जाधव यांनी केले.