Tarun Bharat

आनंदात जगूया

समाजात आनंदाचे तीन प्रकार दिसतात. स्वतःवरती विनोद करून उत्तम साहित्य निर्माण करणारे, त्याला प्राकृतिक आनंद म्हणतात तर दुसऱयाला दुखावून त्रास देऊन हसणारे त्याला विकृत आनंद म्हणतात. परंतु दुसऱयाच्या सुखाने सुखावणारे मात्र आत्मिक निखळ आनंद मिळवतात, असे आनंदाचे झरे शोधायला लागतात. अशा ठिकाणीच आनंदाचे सदरे घातलेली माणसेदेखील भेटतात. फक्त आम्हाला तशी नजर यायला लागते. आम्ही जन्माला आल्यापासून ओझी आमच्या मनावर इतकी वाढतात की आम्ही इतकं वाकून चालतोय हे आमच्या लक्षातच येत नाही. हे वाकून चालताना आमचं नाक थेट जमिनीला लागायची वेळ येते. त्याच्यामुळे आजूबाजूच्या झाडांवर निसर्गात आनंद फुललाय हे कधी आमच्या लक्षातच येत नाही आणि नवसटांनी त्यांच्या 61 व्या वाढदिवसाला एक कविता लिहिली होती, आता मस्त उतार झाडावरचे पक्षी छान गाणं गाणार खरंतर हे सगळं इथेच होतं पण चढ चढण्याच्या नादात जीवन जगण्याच्या नादात आम्हाला कधी ते उमगलंच नाही. जेव्हा आमच्या आनंदात निस्वार्थता येईल तेव्हाच खऱया अर्थाने आम्हाला जगणं कळलं असं वाटेल. जपानमध्ये जीआरू नावाचे आजोबा राहायचे. सकाळी उठून रोज वेगवेगळय़ा दिशांना चालत जायचे. निघताना पिशवीमध्ये फळझाडांच्या बिया, पाण्याच्या बाटल्या आणि जेवण घेऊन निघायचे. बिया पेरायच्या, पाणी घालायचं आणि रात्री जवळपास कुठेतरी राहून पुढच्या टप्प्यावर चालायला लागायचं. असं करत करत ते चार-पाच वर्ष पुढच्या पुढच्या गावांना जात होते. एक दिवस का कुणास ठाऊक त्यांना परत फिरावं वाटलं आणि परतीच्या वाटेवर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आपला बहुतेक रस्ता चुकलाय कारण त्या वाटेवरचं सगळं चित्रच बदललेलं होतं. सगळा परिसर हिरवा गार फळाफुलांनी लगडलेला होता. येणारे जाणारे आनंदाने या झाडाखाली थांबत होते. फळांचा आस्वाद घेत होते हे सगळं पाहिल्यानंतर आजोबा आनंदाने नाचायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं, आपण नेमका शाश्वत आनंदाचा ठेवा या सगळय़ांसाठी आता मागे ठेवून जाणार आहोत. आम्ही मात्र इथली प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची मानून कर्तव्याच्या ओझ्याने वाकून जातो. माऊलींनी हे विश्वची माझे घर म्हटले. याचा अर्थ मी जिथे असेल तो भाग, ते घर, तो परिसर माझाच समजून वागायला लागलो तर असेच झरे निर्माण होतील.

 खरं म्हणजे या जगातली प्रत्येक गोष्ट चांगली निर्माण केली आहे, तोच ती काढून घेणार असतो. त्याला सगळय़ाची कल्पना असते. तोच आमचा खरं म्हणजे मार्गदर्शन करणारा असतो पण तरीसुद्धा आम्ही मात्र सगळी ओझी आमच्या डोक्मयावर घेतो. खरं म्हणजे आमच्या घरामध्ये छान धुडू धुडू धावणार बाळ असतं पण आम्ही मात्र पेपरमधल्या बातम्या वाचून उगीचच लांबट चेहरे करून बसतो आणि आपल्या घरातला आनंदसुद्धा हरवून बसतो. समाजात सण उत्सव हे खरं म्हणजे आनंद निर्मितीसाठी असतात पण आजकालचे स्वरूप पाहिल्यानंतर मात्र हा आनंद कुठे गायब झालाय कळतच नाही. आता मात्र आम्ही सगळय़ांनी एक ठरवायला हवं प्राजक्त सारखं हसायला हवं. मातीत रमायला हवं. दुसऱयासाठी सावली होताना आपण फक्त सोसायचं असतं. प्रातःकालच्या दवबिंदूंसारखं आनंदानं क्षणभर जगायचं असतं, हे लक्षात ठेवायला हवं.

Related Stories

हरवलेली पिढी

Patil_p

रासक्रीडेतील आत्मसुख

Patil_p

शाळेची घंटा

Patil_p

भक्तांचा भगवंत जाता जाता उद्धार करतात

Patil_p

आर्थिक आव्हान

Patil_p

बनाएँगे अब नयी दुनिया अपनी…

Patil_p