दसरोत्सवानिमित्त सर्वत्र भरगच्च कार्यक्रम, वाहने-सोने, अन्य खरेदीसाठीही गर्दी
प्रतिनिधी/ पणजी
’दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ अशी महती सांगणारा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणून ओळखला जाणारा दसरोत्सव आज राज्यात विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
कोरोनामुळे गत दोन वर्षे एका भीतीच्या सावटाखाली सरली. त्यामुळे लोकांना कोणतेही सण, पारंपरिक उत्सव आनंदात साजरे करता आले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर यंदा या उत्सवाला आनंद आणि उत्साहाची वेगळीच झालर प्राप्त झाली असून राज्यात सर्वत्र मांगल्याचे वातावरण आहे. गेले नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवातही लोकांनी मोठय़ा उत्साहात सहभाग घेतला. राज्यातील विविध मंदिरांमध्ये झालेल्या कीर्तन व प्रवचनादी कार्यक्रम आणि शतकांची परंपरा असलेल्या मखरोत्सवांनाही भक्तांनी मोठी उपस्थिती लावली.
सोने लुटण्याची समृद्ध परंपरा
विजयादशमी, दसरोत्सव म्हणजे आनंदोत्सव. या दिवशी अनेक ठिकाणी पारंपरिक शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय गावातील मंदिराच्या परिसरात देव देवतांची पालखी, तरंगोत्सव आणि त्यानंतर सीमोल्लंघनवेळी आपटय़ाची किंवा शमीची पाने लुटली जातात. तसेच ही पाने एकमेकांना देऊन सोने लुटण्याचा आनंद व्यक्त करण्यात येतो.
झेंडुची फुले, आंब्यांच्या पानांना महत्त्व
दसरोत्सवात झेंडुच्या फुलांना मोठे महत्त्व असते. प्रत्येक घरावर आज झेंडूची फुले व आंब्यांची पाने गुंथून तयार केलेले तोरण बांधण्यात येते. त्याशिवाय वाहने धुवून झेंडूच्या माळा बांधून पूजा करण्यात येते. दसरोत्सवानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून बाजारात मोठय़ा प्रमाणात झेंडू फुले व त्यांच्या तयार रंगीबेरंगी माळा मोठय़ा प्रमाणात विक्रीस आल्या होत्या.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज दसऱयादिनी नवीन घरात प्रवेश करणे, वाहन खरेदी, सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे यांनाही फार मोठे महत्त्व असते. त्याशिवाय अनेक व्यापारी आस्थापने, नवीन प्रकल्प यांचीही उद्घाटने या शुभमुहूर्तावर करण्यात येणार आहेत.