Tarun Bharat

मोठ्या कुटुंबांची ‘रेशन कार्डे’ वेगळी करुन देऊ

नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांची घोषणा : ‘प्रशासन तुमच्या दारी’त जाणून घेतल्या जनतेच्या समस्या,कृषी कार्ड योजनेत सुधारणा करण्याचेही आश्वासन

पणजी : ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘प्रशासन तुमच्या दारी’ या तिसवाडी तालुक्यासाठीच्या कार्यक्रमात तालुक्यातील जनतेने आपल्या समस्या मांडत त्या सोडविण्याची मागणी केली. ज्यादा सदस्य असलेल्या कुटुंबांच्या शिधापत्रिका विभक्त करुन देणार, अशी घोषणा नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी केली. तसेच तरुणांना किसान कार्डचा लाभ मिळावा म्हणून दुरुस्ती करण्याचीही तयारी त्यांनी यावेळी दर्शविली. पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेज्झस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कृषी व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक, सांताक्रुझचे आमदार ऊदाल्फ फर्नांडिस, विविध खात्याचे अधिकारी व मामलेदार उपस्थित होते. पाच लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका नागरीपुरवठा खात्याकडे जमा करावी, त्यांना यापुढे लाभ मिळणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्याची मुदत 31 मार्च अखेर संपत  आहे.

जुने गोवे पंचायत सदस्यांची मागणी

जुने गोवे पंचायत सदस्यांनी ही जाचक अट रद्द करण्याची मागणी केली. गोव्यात अजूनही एकत्र कुटुंबपद्धती आहे. शिवाय अनेक लोकांचे एकाच शिधापत्रिकावर अनेक कुटुंबातील सदस्यांची नावे असल्याने त्यांचे उत्पन्न नागरीपुरवठा खात्याच्या अटीनुसार अधिक होते. त्यामुळे 5 लाख उत्पन्न जरी मोठे वाटत असले तरी प्रत्यक्षात शिधापत्रिकेवर अनेक कमवत्या व्यक्ती ह्या आजही विभक्त राहतात त्यांची नावे शिधापत्रिकेवर एकत्र दिसतात. म्हणून यावर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली.

शिधापत्रिका विभक्त करुन देणार 

नागरीपुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांना सूचना करताना सांगितले की, एकत्र कुटुंबातील सदस्य शिधापत्रिकेवर अधिक दिसतात. त्यामुळे त्याच पत्यावर एकाच घरक्रमांकावर अ), ब), क), ड), अशी संरचना करून विभक्त शिधापत्रिका बनवून देण्यासाठी जनतेला सहकार्य करावे. यावर अभ्यास करून फाईल खात्याकडे वर्ग करावी, अशी सूचना मंत्री रवी नाईक यांनी करून यावर पर्याय काढण्याचे आश्वासन दिले.

कृषी कार्डाबाबत योग्य तोडगा काढू

करमळीचे पंचायत सदस्य भुवनेश्वर फातर्पेकर यांनी कृषी कार्ड योजनांचा युवकांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषी संचालकांनी सुटसुटीत प्रक्रिया करावी, अशी मागणी केली. कारण 1/14 उताऱ्यावर जर वाड-वडिलांची नावे असली आणि ते हयात नसले तर कृषी कार्डचा फायदा युवकांना शेती करण्यासाठी घेता येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर कृषीमंत्री रवी नाईक यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढू असे आश्वासन दिले.

प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमात खाजन शेतजमीन, शेतीसंबंधी योजना, पाण्याची समस्या आदींवर नागरिकांनी समस्या मांडल्या. यावेळी विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांचे टिपण करून त्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. प्रशासन तुमच्या दारी या उपक्रमाला तिसवाडी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामध्ये चिंबल तलावाचा विकास, चोडण फेरीची समस्या, कामुनिदाद जागेचा विषय, कृषी कार्ड, शिधापत्रिकांचे उत्पन्न निश्चित करताना प्रक्रिया सुटसुटीत करणे, आदी विषय मांडण्यात आले. मंत्री रवी नाईक यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या त्वरित सोडविण्याचे आवाहन करताना ज्या दुसऱ्या खात्याअंतर्गत असणाऱ्या समस्या त्या खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमात पेटू कवळेकर, पंढरी वेरेकर, अग्नेलो वाझ, टोनी बर्का, बांबोळी कोमुनिदादचे पदाधिकारी लीओकार्दो मोन्तेरो, दिवाडी पंचायतीच्या पंच सदस्या व्हीक्टर फर्नांडिस, करमळीचे पंच भुवनेश्वर फातर्पेकर, सांताक्रुज येथील शेतकरी मारियो ब्रागांझा, प्रेमानंद म्हांबरे, जुने गोवेच्या सरपंच श्रीमती सॅण्ड्रा, चोडणच्या शेतकरी नम्रता खांडेपारकर, मेरशीचे सरपंच यांनी भाग घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली.

पंचायत सदस्यांचे मानधन दुप्पट करा….

ग्रामपंचायतीवर निवडून आलेले पंच सदस्याना देण्यात येणारे मानधन हे तुटपूंजे आहे. गावातील जनतेची कामे करताना लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा असतात. एखादा कार्यक्रम राबवायचा म्हटल्यास आम्हाला स्वत:च्या खिशातून पैसे काढावे लागतात. गावात लहान लहान मंडळे, बचत गट यांचे कार्यक्रम घेतल्यास त्यांना वर्गणीही द्यावी लागते. पंचायत प्रभागात विकासकामे राबविताना निधी कमी पडल्यास अतिरिक्त येणारा खर्च आम्हालाच करावा लागतो, त्यामुळे पंचायत सदस्य म्हणून आम्हाला देण्यात येणारे मानधन हे अपुरे असल्याने ते तिप्पट करावे, अशी मागणी मेरशीचे पंच सदस्य सुशांत गोवेकर व चोडणचे पंच रवींद्र किनळेकर यांनी केली. यावर मंत्री रवी नाईक यांनी पंचायतमंत्री व खात्याला आपले म्हणणे कळवून मानधन वाढीचा विचार करण्यात येईल, असे सांगितले.

Related Stories

प्रो. फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लुब, धेंपोचे दमदार विजय

Amit Kulkarni

पर्वरी वेताळ महारुद्र संस्थानात आज वर्धापनदिन सोहळा

Amit Kulkarni

होंडा आजोबा देवस्थानात आज अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम

Amit Kulkarni

गोव्याचे आर्थिक भवितव्य केंद्र सरकारच्या हाती

Omkar B

इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी प्रारंभ

Patil_p

काँग्रेस पक्ष गोव्याचे कोळसा केंद्र होऊ देणार नाही,

Patil_p